पान:Sanskruti1 cropped.pdf/43

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 तेथे हिंडता-हिंडता त्यांना एक मोठी गुहा (४.४९.७ महाबिलम् ) दिसली. तीत ते महिनाभर अडकून पडले. त्या बिळातून स्वयंप्रभा नावाच्या बाईने त्यांची सुटका केली. “डोळे मिटून घ्या, मी तुम्हाला या गुहेबाहेर नेते," असे ती म्हणाली. गुहेबाहेर नेल्यावर त्यांना डोळे उघडायला सांगून तिने सांगितले, "हा विंध्य पर्वत. हे प्रस्त्रवण नावाचे शिखर, व खूप पाणी असलेला हा सागर " (४.५२.१२). वानर येथे विचार करीत बसलेले असताना संपाती नावाचा जटायूचा भाऊ त्यांना दिसला. तोही सांगतो की ह्या विंध्याच्या शेजारी सागर आहे. तो ओलांडला की, त्रिकूट नावाचा पर्वत आहे. तेथेच एका शिखरावर लंका नावाची राक्षसाची राजधानी आहे. रावण कोठच्या मार्गाने गेला, त्या मार्गाचेही वर्णन संपातीने केले. संपातीचा मुलगा सुपाश्च म्हणून होता. तो विंध्य पर्वताच्या महेंद्र नावाच्या शिखराशी एक पलीकडे जायला अरुन्द मार्ग होता, तेथे उभा होता. ह्या मार्गाला महेन्द्रद्वार असे नाव दिले आहे. (४.५८.१३). ह्याच ठिकाणाहून एक नदी वाहत होती. तिथे पलीकडे समुद्र होता. ह्या दारातून जायला एक अगदी अरुंद रस्ता होता. त्या रस्त्यावर द्वार राखून सुपाश्च उभा असता त्याला एक प्रचंड काळाकभिन्न पुरूष एका बाईला धरून नेताना दिसला. "कृपा करून मला रस्ता दे" असे त्या पुरुषाने म्हटल्यावर सुपाश्च बाजूला झाला व त्याने रस्ता दिला. हाच पुरूष रावण व ती बाई मैथिली सीता असावी, असे संपाती म्हणाला. संपातीने त्यांना महेंद्र पर्वताचा मार्ग दाखविला. तेथून 'ती पाहा लंका' म्हणून लंकाही दाखविली. अगस्त्याश्रम गोदावरीजवळ नसून कोठेतरी विंध्यात होता, असे महाभारतात वर्णन आहे (३.४८.१५ ) प्रो. शेजवलकर ह्यांनी तो बुंदेलखंडातील कालंजर पर्वताशेजारी असावा, असे म्हटले आहे.
 किष्किंधाकांडाचे संपादक प्रो. मांकड आपल्या प्रस्तावनेत हा सर्व मार्ग देतात. दक्षिणेकडील पी. एस. अय्यर ह्या संशोधकाने 'रामायण अँड लंका' असे पुस्तक लिहिले आहे. त्यामध्येही ह्या सर्व गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. ह्या गृहस्थांनी हिंदुस्थानचा नकाशा हाती घेऊन वर दर्शविलेली सर्व स्थाने शोधून काढण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी ही लंका नर्मदेच्या उत्तरेलाच आहे, असे ठरविले आहे.

४०

।। संस्कृती ।।