पान:Sanskruti1 cropped.pdf/42

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

काही बातमी नसावी इतके तुझे हेर गाफील आहेत." हे ऐकल्यावर रावण ताबडतोब आपल्या पागेमध्ये गेला व त्याने सूताला रथ जोडावयास सांगितला. उत्तम खेचरे लावलेला रथ सूताने तयार केला व रावण त्यात बसून निघाला.
 रावण रथात बसल्यावर त्याला समुद्राच्या पलीकडील तीर, तिथल्या नावा, मोठमोठाले प्रासाद दिसत होते, असे वर्णन आहे. रावणाने समुद्र ओलांडला व तो मारीचाश्रमाला आला. म्हणजे रावणाने ओलांडलेला "समुद्र" रथातून ओलांडण्यासारखा होता. मारीचाश्रम कोठे होता? ह्या समुद्राकाठीचा ! हा समुद्र किंवा पाणथळ प्रदेश दुसऱ्याच एका गोष्टीत महाभारतामध्ये उल्लेखिलेला आहे. महाभारताच्या आदिपर्वाच्या २५ व २६ या अध्यायांमध्ये गरूडाने "एक मोठी वृक्षशाखा कोठे टाकू?" असे आपला बाप जो काश्यपऋषी याला विचारिले. "ब्राह्मण नसलेल्या अशा एका देशाचे नाव मला सांगा." काश्यपाने एक प्रदेश सांगितला. तेथे गरूडाने फांदी टाकली, असे वर्णन आहे. तो पर्वत कुठे असावा, हे मात्र धडसे कळत नाही. कोठेतरी उत्तरेस असावा असे वाटते. त्या पर्वतावरून गरुडाने उडी मारली व स्वर्गात जाऊन अमृतकुंभ आणला, असे वर्णन आहे. रामायणामध्ये मारीचाश्रमाचे वर्णन देताना ह्याच महावृक्षाची शाखा जेथे पडली व जेथून अमृत आणायला गरूड गेला ते स्थान, असे म्हटले आहे. ह्यावरुन हे स्थान कोठेतरी उत्तरेकडे असावे, असे वाटते. मारीच व रावण रथात बसून जनस्थानात गेले. त्यांनी वाटेत नाना नगरे व राष्ट्रे पाहिली (३.४०.८) असे वर्णन आहे. पण ते बरोबर वाटत नाही. मारीचाश्रमाहून निघून ते त्याच दिवशी, कदाचित एकदोन दिवसात, जनस्थानात गेले असावेत. हा सर्व प्रवास रथात बसूनच झाला. म्हणजे रावणाची लंका जनस्थानापासून फार लांब नसावी, असे वाटते.
 राम सीतेला शोधीत शोधीत साधारणपणे पश्चिमेकडे व दक्षिणेकडे जात होता. वाटेमध्ये त्याला निरनिराळे आश्रम व पर्वत लागले. पण त्याने गोदावरी नदी ओलांडली, असे कुठेच वर्णन नाही. रावणानेही ही गोदावरी नदी ओलांडल्याचा उल्लेख नाही. वानर जेव्हा दक्षिण दिशेला सीता शोधावयास गेले, तेव्हाही गोदावरीचा उल्लेख कुठे नाही. दक्षिण दिशेला ते विंध्याच्या अरण्यातून हिंडत होते (४.४८.१५ ) .

।। संस्कृती ।।

३९