पान:Sanskruti1 cropped.pdf/41

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्याचा वध करून त्याने सांगितलेल्या मार्गाने तेथून दीड योजन दूर असलेल्या शरभंगाच्या आश्रमात गेला. तेथून बराच रस्ता तुडवून (३.६.२. गत्वा दूरमध्वानम्) राम सुतीक्ष्णाच्या आश्रमाला आला. तेथून दुसऱ्या दिवशी पंचाप्सरस नावाच्या सरोवराशेजारून जात ते दंडकारण्यातील मुनींच्या आश्रमात आले. तेथून राम निरनिराळ्या ऋषींचा पाहुणचार घेत १० वर्षे राहिला व परत सुतीक्ष्णाश्रमाला आला. सुतीक्ष्णाश्रमाहून चार योजनांवर अगस्त्य ऋषींच्या भावाचा आश्रम होता. तेथे तो दुसऱ्या दिवशी गेला. तेथून एका योजनावर अगस्त्य ऋषींचा आश्रम होता. तेथून दोन योजनांवर पंचवटी होती. तेथे रामाने आश्रम बांधिला व ते तेथे राहू लागले.
 येथून जवळपासच कोठेतरी जनस्थान नावाचा प्रदेश होता. सीता नाहीशी झाल्यावर रामाने पंचवटी व जनस्थान धुंडाळले; पण ती सापडली नाही. जटायु मरणाच्या द्वारी पडलेला दिसला. त्याची क्रिया आटपून ते पश्चिमेला गेले. थोड्या वेळ्याने ते दक्षिणेकडे गेले. तीन कोस गेल्यावर त्यांना क्रौंचारण्य लागले. येथे त्यांनी कबंधाचा वध केला. कबंधाने त्यांना पुढचा मार्ग सांगितला. "पश्चिमेला बराच मार्ग गेल्यावर पंपा नावाच्या सरोवराच्या पश्चिम तीरावर तुम्हाला शबरीचा आश्रम व मातंगाश्रम दिसेल. पंपा ओलांडल्यावर ऋष्यमूक पर्वत दिसेल. तेथे त्यांनी सुग्रीवाशी सख्य करावे."
 ऋष्यमूकाहून पहिल्यांदा वानर व नंतर वानरसैन्यासह राम लंकेला कसे गेले, तो मार्गही रामायणात दिलेला आहे. पण त्याआधी रावण सीताहरण करण्यासाठी पंचवटीला कोणत्या मार्गाने आला. ते पाहू.
 रावणाची बहीण शूर्पणखा हिचे नाक-कान कापल्यावर ती जनस्थानातच आपले भाऊ खर-दुषणांकडे गेली व रामाचा सूड घेण्यास तिनं सांगितले. खर दूषण व त्यांचे सहाय्यक यांना रामाने मारल्यावर शूर्पणखा लंकेला आपला भाऊ जो रावण याच्याकडे गेली व तिने त्याची खूप निर्भर्त्सना केली, "तू असला कसला राजा ? (अध्याय ३१) माझी काय दशा झाली, ते बघ. जनस्थानात असलेले तुझे सर्व भाऊ मारले गेले आहेत व ह्यातली तुला

३८

।। संस्कृती ।।