पान:Sanskruti1 cropped.pdf/34

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कसे काय हे ऋषींनी स्पष्ट केले नाही पण देवांची गुप्त योजना त्यांना माहीत होतीशी दिसते. शेवटी भारद्वाजाने सांगितलेल्या मार्गाने सर्वजण चित्रकुटाला पोचतात. लक्ष्मण लांबूनच भरताला पाहतो व त्वेषाने म्हणतो, "आपल्याला मारावयाला हा, कैकयीचा मुलगा भरत येतो आहे" (२.९०.१३) "राज्याचा लोभ धरणाऱ्या कैकयीला आज आपला मुलगा लढाईत माझ्या हातून मारलेला दिसेल. (२.९०.२०)
 रामाने ज्याला म्हटले, "भरताने कधीतरी तुझे अप्रिय असे केले होते का ? आज तुला एवढी भीती का वाटते की, तू भरताबद्दल शंका घेऊ लागला आहेस?" हे रामाचे वाक्य वाचून आनंद वाढतो; कारण भरताबद्दल त्यात सद्भाव व्यक्त केला आहे. पण पूर्वी वनात जाताना त्याने भरताबद्दल फारच कटू उद्गार काढले होते. "हाय, आता कैकयीचा मुलगा भरत, संपन्न कोसलाचा एकमेव भोक्ता होऊन सुखी होईल.”
 सुखीबत सभार्य च भरतः कैकयीसुतः ।
 मुदितान् कोसलाने एको यो भोक्ष्यत्यधिराजवत् । (२.४७.११)
 "म्हातारपणाने वडील मेल्यावर व मी अरण्यात असल्यावर तोच आता एकटा राज्याचे मुख होणार (२.४७.१२) " भरत कौसल्येला व सुमित्रेला छळील असे तो म्हणत नाही. पण
 "अपीदानीं न कैकयी.... कौसल्यां च सुमित्रां च ।
 संप्रबाधेत मत्कृते" ।। (२.४७.१५)
 "कैकयी आता कौसल्या - सुमित्रांना माझ्यावरील द्वेषाने छळणार तर नाही?" अशी शंका व्यक्त करतो. अर्थात हे उद्गार वनवासाला जायचे हे कळल्यानंतर लगेचचे आहेत. त्या वेळी आघात एवढा मोठा होता की, क्षणभर रामसुद्धा गडबडला. पण वनवासात एक पंधरवाडा शांतपणे राहिल्यावर त्याने भरताच्या मनाची नीट परीक्षा केली असे दिसते.
 भावा-भावांची भेट होते. राम भरताला मांडीवर बसवून प्रेमाने विचारतो, "अरे, तुझ्या वडिलांनी तुला अरण्यात कसे येऊ दिले? दशरथ राजा कुशल आहे ना?" हे प्रश्न विचारून नंतर त्याच्या उत्तराची वाटही न पाहता

३२

।। संस्कृती ।।