पान:Sanskruti1 cropped.pdf/32

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 चौदाव्या दिवशी सर्व अधिकारी पुरूष (राजकर्तारः) एकत्र येऊन त्यांनी भरताला विनंती केली की, "आता तू आमचा राजा हो. अभिषेकाची सर्व तयारी झाली आहे. भरताने ठाम सांगितले की, मोठा भाऊ राम राजा होईल. मी कदापि अभिषेक करून घेणार नाही. चला रानात जाऊ व त्याला परत आणू."
 भरताने सर्व गोष्टी अंतःपुरातून व तेथील क्षुद्र कारस्थानातून बाहेर चव्हाट्यावर काढल्या. आईचेही ऐकले नाही, मंत्र्यांचेही ऐकले नाही. तो स्वाधीन होता. काय करायचे, ते त्याचे ठाम ठरले होते. कोठे एका क्षणीही चित्त विचलित न होता त्याने ठरविलेल्या गोष्टी केल्या. मी करतो, ह्याखेरीज दुसरा काही मार्ग आहे हेच त्याला दिसत नव्हते. रामाने "कैकेयी किती दुष्ट आहे! बसू दे भरताला आता निर्वेधपणे राज्यावर " असे शब्द वनात काढले होते. भरत असे काहीच बोलला नाही. त्याचे मन द्विधा नव्हतेच मुळी. रामावर त्याचा विश्वास अचल होता. त्याची प्रत्येक कृती ही त्याच्या आंतरभावाची निदर्शक होती. त्याने राजसभा बोलाविली. तो कोणाचाच नावडता नव्हता. पुरोहितांनी त्याला राज्यावर बस, म्हणून विनंती केली. पण भरताने ती झिडकारून लाविली व मी रामाला आणायला जातो, म्हणून त्याने सांगितले.
 वनात निघायचे ठरल्यावर सगळीच बरोबर आली. सर्व मंत्री, वसिष्ठ, तिन्ही आया, पौरजन व रस्ते साफ करणारे एक सबंध पथक त्यांत सुतार होते, खणणारे होते, यन्त्रकोविद ( ? ) होते, म्हणजे ज्याला हल्ली फौजेचे इंजिनिअर म्हणतात ते सर्व होते. ते पुढे जाऊन रस्ता करीत व मागून बसून राजपुरूष व राजस्त्रिया जात, असे वर्णन आहे.
 रामाने जेथे जेथे मुक्काम केला तेथे तेथे भरताचाही मुक्काम झाला. पण प्रत्येक ठिकाणी भरताबद्दल संशय उत्पन्न झाला. गुहाला वाटले हा सैन्य घेऊन चालून तर आला नसेल? तो आपल्या सर्व बांधवांना व होड्यांना सज्ज होण्याचा आदेश देऊन भरतापुढे गेला. भरताने आपण का आलो ते सांगितले तेव्हा गुह म्हणाला,

३०

।। संस्कृती ।।