पान:Sanskruti1 cropped.pdf/27

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

देऊन त्याने रहावे, अशी व्यवस्था करावयास तो निघाला होता. त्यावरूनही असे वाटते की, चौदा वर्षांनंतर रामाला राज्य द्यावयाची किंवा त्यासारखीच दुसरी काही व्यवस्था तो करणार होता. कैकेयीने रामाला बरोबर काही नेऊ दिले नाही; तर कौसल्या म्हणते आहे की, असले उष्टे राज्य रामाला नकोच म्हणून.
 ह्या सर्व प्रकारात स्वतःचा मुलगा चौदा वर्षे दिसणार नाही, हे दुःख सोसूनही संयम ढळू दिला नाही तो सुमित्रेने तिने कौसल्येला शुद्धीवर आणिले व कौसल्येने हात जोडून दशरथाची क्षमा मागितली. पण रामाबद्दलचा शोक व स्वतःबद्दलची कीव काही तिला आवरता आली नाही.
 ह्याच अवस्थेत अति थोडक्यात दशरथ आपण तरुणपणी म्हाताऱ्या आईबापांच्या एकुलत्या-एक मुलाला कसे चुकून मारिले ते सांगतो. आपल्याला ही गोष्ट 'श्रावण' नावाच्या पितृभक्त मुलाची म्हणून माहीत आहे. संपादित रामायणात त्या मुलाचे नाव येत नाही. दशरथ सांगतो, "जसं करावं, तसं भरावं. मी वृद्ध माता-पित्यांना पुत्रशोकाने मारिले; त्यांच्या शापाने मी मरतो आहे.” दशरथ तरूण, लग्न न झालेला असतांना त्याला शिकारीचा षोक होता. नुसत्या शब्दवेधाने लक्ष्यावर बाण मारण्याचे तो शिकला होता. ही आपली नवी शक्ती त्याला खरोखरच शिकारीत अजमावून पहावयाची होती, म्हणून शरयूतीरावरच्या रानात तो शिकारीला गेला. तेथे त्याला नदीवर सावज (हत्ती) पाणी पिते आहे, असा आवाज आला व त्याने बाण सोडला. खरोखरच बाणाने शब्दवेध घेतला व 'हाय ! मेलो!' असे शब्द दशरथाला ऐकू आले. दशरथ बावरून त्या ठिकाणी आला, तो एक तरूण वर्मी बाण लागलेला असा त्याला दिसला. तो तरूण आपल्या तहानलेल्या आईबापांसाठी पाणी नेण्यास आला होता. भांडे पाण्यात बुडविताना बुडूबुडू असा जो आवाज झाला, तो एखाद्या जनावराचाच, असे दशरथाला वाटले. त्या तरूणाला वाचविता आले नाही; पण दशरथ पाण्याचे भांडे घेऊन तरूणाने सांगितलेल्या ठिकाणी आला; कापत कापत, भीतीने व दुःखाने झाला प्रकार दशरथाने त्यांना सांगितला; त्यांच्या सांगण्यावरून मुलाचे प्रेत

।। संस्कृती ।।

२५