पान:Sanskruti1 cropped.pdf/25

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अयोध्याकांड . २

भरतभाव


 ह्या भागाला 'भरताचे दिव्य' असे नाव मी पहिल्याने दिले होते, वामनपण्डितांनी हाच कथाभाग 'भरतभाव' ह्या अर्थवाही सुंदर शब्दाने सांगितला आहे. ('करूनि वंदन जानकिनायका । भरतभाव निरोपिन आयका') त्याची मला आठवण झाली. तेव्हा 'दिव्य' वगैरे मूल्यांनी ठासून भरलेल्या (loaded) शब्दापेक्षा 'भाव' हाच शब्द सर्व तऱ्हांनी जास्त स्वीकरणीय वाटला. वामनपंडितांना स्मरून तोच शब्द मी उचलला. त्यांनी हा कथाभाग हृद्य तऱ्हेने सांगितल्यावर मी तेच खडबडीत गद्यात सांगण्याचे प्रयोजन काय? एवढेच की, माझ्यापुढे रामायणाची संशोधित आवृत्ती आहे, ती त्यांच्यापुढे नव्हती.
 रस्त्यावर पडलेल्या दशरथाला उचलून कौसल्येच्या महालात आणिले. स्वतःच्या कृत्याने तो शरमिंदा झाला होता. सुमंत्राने लक्ष्मणाचा निरोप आणिला होता. त्यात म्हटले होते, वरदानाच्या निमित्ताने सर्वथैव वाईट कृत्य राजाच्या हातून घडलेले आहे. (२.५२.२७). वरदान हे सर्वांनाच निमित्त वाटत होते.
 रामासाठी शोक करून करून त्याचा जीव कासावीस झाला होता. पण एवढ्याने भागले नाही. कौसल्येचा धिक्कार त्याला ऐकायचा होता. रामाने तिला सांगितले होते, "राजाला जास्त तापवू नकोस; दुःख देऊ नकोस." पण कौसल्येने ते ऐकिले नाही. तिने तीव्र शब्दांनी राजाचा धिक्कार केला- राममात्रा क्रुद्धया राजा परूषं वाक्यं श्रवितः । (२.५६.१.).
 हतं त्वया राज्यमिदं सराष्ट्रं हतस्तथात्मा सहमन्त्रिभिश्च ।
 हता सपुत्रास्मि हताश्च पौराः सुतश्च भार्या च तव प्रहष्टौ ।। (२.५५.२०).

।। संस्कृती ।।

२३