पान:Sanskruti1 cropped.pdf/24

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 राम राज्यातून गेला, तेव्हा राज्याचे जे वर्णन आहे, तेही पुढील काव्यपरंपरेला साजेसे वाटते-
 चैत्यशतैः जुष्टः दैवस्थानैः उपशोभितः जनपथः ।
 (झाडांखालच्या शेकडो चैत्यांनी व देवस्थानांनी नटलेला प्रदेश) हे वर्णन पुरातन वाटत नाही.
 राम त्या रात्री तमसेच्या तीरावर निजला. दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे उठून, आपल्याबरोबर आलेल्या नागरिकांना चुकवून तो राज्याची हद्द जे शृंगवेरपुर तेथे आला. तेथे त्याला गंगा दिसली. येथेही सीतेने गंगेला नमस्कार करिताना "आम्ही चौदा वर्षांनी येऊ. रामाला राज्याभिषेक होईल, तेव्हा मी तुझी पूजा करीन,” असे म्हटले आहे. तेथे गुहराजाच्या मदतीने सर्वजण गंगापार झाले. गंगापार होण्याआधी रामाने व लक्ष्मणाने केसांना उंबराचा चीक लावून त्यांच्या जटा बनविल्या.
 गंगेच्या उत्तर तीरावरच रामाने सुमंत्राला परत धाडले. रामाने लक्ष्मणाला सांगितले, “तू पुढे हो. मध्ये सीता राहू दे व मी तुम्हा दोघांचे रक्षण करीत मागून चालतो (२.४६.७६). 'लक्ष्मण भावोजी मागे, पुढे स्वामी' हे मोरोपंतांचे वर्णन ह्यावरून चुकीचे वाटते.
 राम नंतर प्रयागी भारद्वाज ऋषींच्या आश्रमात गेला. तेथे एक दिवसाचा पाहुणचार घेऊन, त्यांनाच वाट विचारून तेथून काही कोसांवर असलेल्या चित्रकूट-पर्वतावर तो गेला. ते स्थान त्याला इतके आवडले की, त्याने लक्ष्मणाला लाकडे तोडून पर्णकुटी बांधावयास सांगितले, व ती बांधून झाल्यावर तीत रहायला जाण्याआधी एक मोठा ऐण (काळवीट) मारून त्याच्या मासाचे हवन केले व आता चौदा वर्षे चित्रकूटावर रहावयाचे, असा त्यांनी बेत केला. येथे राम इतक्या सुखात होता की, त्याने सीतेला नाना सौंदर्यस्थळे दाखविली व म्हटले, "लक्ष्मण माझ्या आज्ञेत आहे, तू मला अनुकूल आहेस. मी आनंदात आहे. कित्येक वर्षे जरी इथे राहिलो, तरी मला वाईट वाटणार नाही."

२२

।। संस्कृती ।।