पान:Sanskruti1 cropped.pdf/23

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

रामाने व लक्ष्मणाने उचलून पलंगावर बसविले. तो बेशुद्ध झाला ते पाहून सर्व स्त्रियांत एकच हाहाकार उडाला व सर्वत्र रडारड सुरू झाली. एवढ्या बायका कशाला बोलावल्या होत्या. कोण जाणे! ह्या सर्व महत्त्वाच्या गोष्टी अंतःपुरात चालल्या होत्या. राजसभा, राजगुरू, राजमंत्री जणू नव्हतेच. परत महाभारतामधील व रामायणामधील फरक जाणवतो. ते भांडण पुरुषांचे, कडक, बाहेरच्या जगातले तर इथे अंतःपुरातील हेवे दावे व स्त्रैणपणा.
 रामाने निरोप मागितला. दशरथ म्हणाला, "तू राजा हो. मला बंधनात टाक" रामाने ते मानिले नाही." बरं, जा, पण आज जाऊ नकोस: उद्या सकाळी जा." रामाने तेही मानिले नाही. तेव्हा राजाने सुमंत्राला सांगितले, "चतुरंग सेना, धनधान्य, संपत्ती रामाबरोबर द्यावी. त्याचप्रमाणे ज्या संपन्न माणसांना रामाबरोबर जायचे असेल, त्यांनाही जाऊ दे, राम वनात राहील. तो येईपर्यंत भरत अयोध्येचे पालन करील." हे शब्द ऐकून कैकेयीने खाडकन बजाविले की, "राजा, ज्या राज्यातले धन गेले आहे, असे राज्य माझ्या भरताला नको. असे राज्य म्हणजे स्वाद गेलेल्या मद्यासारखे आहे. हवे आहे कुणाला ते? तुला जर वचन पाळायचं, तर नीट पाळ." राजा म्हणाला, "तर मग मी पण रामाबरोबर जातो. तू नि भरत राज्य करा." राम म्हणाला, "राजा, मला धनाची गरज काय ? कोणी तरी वस्त्रे व कु-हाड द्या, म्हणजे पुरे." कैकेयीने ताबडतोब तिघांनाही वल्कले दिली. सीतेला वल्कल नेसता येईना. ते रामाने तिच्या लुगड्यावरून नेसविले. शेवटी बराच शोक करून दशरथाने रथ जोडून तिघांना राज्याबाहेर घालविण्यास सुमंत्रास सांगितले. जाताना सुंदर वस्त्रे कोशागारातून आणून त्याने सीतेला नेसविली. तिघे रथातून चालू लागली. सबंध शहर मागे लोटले. राजाही मुलांचे शेवटचे दर्शन व्हावे, म्हणून रस्त्यावर आला. रामाने आपल्या आईला रथापाठीमागे धावताना जणू तिचा नाचच चालला आहे, अशी पाहिली. ते दृश्य त्याला पाहवेना. राजा 'रथ हळू ने' असे सांगत होता. रामाने सांगितले, " सुमंत्रा, रथ दौडव. राजा रागावला, तर म्हणावे तुमचे म्हणणे ऐकू आले नाही." राम दिसेपर्यंत, रामाच्या रथाची धूळ दिसेपर्यंत राजा रस्त्यावर होता. तो शेवटी तेथेच पडला. एका बाजूला कैकेयी होती, तिची तो निर्भत्सना करू लागला. त्याला हळूहळू कसेबसे कौसल्येच्या महालात नेले.

।। संस्कृती ।।

२१