पान:Sanskruti1 cropped.pdf/21

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 कौसल्येकडून निघून राम स्वतःच्या राजवाड्यात येतो. तेथे सीता त्याची वाट पाहत बसलेलीच. कैकेयीसमोर, कौसल्येसमोर राम मोठ्या धीराने वागला. पण सीतेपुढे त्याला आपली व्यथा लपविता आली नाही. सभोवतालचे लोक आनंदात मग्न होते. राम आला तो शरमिंदा असा. सीता त्याला सामोरी गेली, तो तिला दिसले की, त्याची मुद्रा शोक व चिन्ता ह्यांनी पांढरीफटक पडली होती. तो घामेजलेला व किंचित संतापलेला असा दिसत होता. तीही घाबरून गेली. "आता तुझा अभिषेक व्हायचा ते हे काय? तू असा का दिसतोस?" तेव्हा रामाने थोडक्यात तिला सर्व सांगितले. सीता ते ऐकून सुन्नच झाली. पण रामापासून दूर रहायला ती मुळीच तयार नव्हती. भवभूतीने सर्वमुखी केलेल्या ओळी येथेच येतात. 'त्वया सह निवत्स्यामी वनेषु मधुगन्धिषु' (तुझ्याबरोबर सुवासिक अरण्यांत मी राहीन). ह्याच संबंधात सीता सांगते की, माहेरी लहानपणी ब्राह्मणांच्या तोंडून ऐकलं होतं की, माझ्या कपाळी वनवास आहे (२.२६.६). असं काहीतरी अचानक एकदम मधेच सांगून टाकायचे, ही एक रामायणाची लकबच आहे. त्याच्या आधी व त्याच्या मागून परत कधी ते येतही नाही. आपलं आयत्या वेळी आठवलं, सांगितलं, असं हे वाटतं. कैकेयीच्या वरांचे प्रकरण असेच आहे. ते वर आपण मागितले, हे कैकेयीला आठवतही नव्हते. ते कधी मागितले, कसे मागितले, हे सर्व मंथरेला सांगावे लागले! पुढेही एकदोन स्थळे अशीच आहेत. सीतेने रडून रडून रागावून रामाची व नंतर सासूची परवानगी मिळविली; लक्ष्मण नेहमीप्रमाणे हात जोडून जवळच उभा होता. त्याला रामाने सागितले की, "मी जातो. माझ्यामागे कौसल्येचे, सुमित्रेचे रक्षण कर." वगैरे. लक्ष्मणाने हे बोलणे उडवूनच लाविले. "रामा, जेथे तू तिथे मी. कुदळ, फावडे खांद्यावर घेऊन मी तुझ्याबरोबर येणार. कौसल्येबद्दल, तुला काळजी नको माझ्यासारख्या हजारांचा भार सहन करण्यास ती समर्थ आहे." परत एक आतापर्यंत जिचा उल्लेख आला नाही, अशी नवीनच गोष्ट आपल्याला कळते. परत ह्या गोष्टीचा उल्लेख नाही. संपादकांनी खाली टीप दिली आहे की, राजाने जेव्हा कैकेयीशी लग्न केले, तेव्हा कौसल्येला

।। संस्कृती ।।

१९