पान:Sanskruti1 cropped.pdf/17

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मंथरेने ताबडतोब कैकेयीचे बोलणे खोडून काढिले, “रामाच्या मागाहून रामाचा मुलगा येणार. राजाचे काय सगळे मुलगे कधी राज्यावर बसतात का? तसे झाले, तर अनर्थच होईल. भरताने इथे असायचं, ते तू त्याला आपले आजोळीच पाठवून बसलीस." वगैरे (२.८.१३,१९). | "गर्वाने पूर्वी रामाच्या आईचा-आपल्या सवतीचा-तू अव्हेर केला होतास, तर आता ती तुला तशी सोडील का ? दासीप्रमाणे कौसल्येपुढे तुला हात जोडून उभे रहावे लागेल. रामाच्या बाजूच्या स्त्रिया आनंदित होतील. तुझ्या सुनांना मात्र वाईट दिवस येतील” (२.८.५). हे सर्व तिने कैकेयीला पटविले. राजाकडून कैकेयीला जे दोन वर येणे होते त्यांची आठवणही मंथरेलाच करून द्यावी लागली, व पुढे काय करावयाचे, ते ठरले. खरोखरच राजाने पूर्वी वर दिले होते का, अशी थोडी शंका येते. पुढे ती रागावली आहे, हे पाहून तिचा अनुनय करिताना राजा म्हणाला की, "तू मागशील ते देतो.” कैकेयीने बरेच आढेवेढे घेतले, तेव्हा “मी जे म्हणून पुण्य केले आहे, त्याची शपथ घेऊन सांगतो की, तू सांगशील ते मी करीन." (करिष्यामि तव प्रीतिं । सुकृतेनापि ते शपे। २.१०.१९) असे म्हणाल्यावर कैकेयीने दोन वर मागून घेतले. तिने ते मागू नयेत, म्हणून राजाने तिची याचना केली; तिच्या पायांवर लोटांगण घातले; तेव्हा त्याच्या शपथेची तिने आठवण दिली व त्याच्या कुळाच्या सत्यप्रतिज्ञत्वाच्या ख्यातीबद्दल त्याला | सुनाविले. पूर्वी वर दिलेले असणे ह्या प्रसंगात आवश्यक दिसून येत नाही. कैकेयीने वर मागून घेतल्यावर राजा बेशुद्ध पडला. पण तेवढ्यात त्याने सुमंत्राला बोलावून रामाला आणावयाला सांगितले (२.१३.२१). राजाचे बोलणे म्हणजेच आज्ञा-ऐकून तो रामाला बोलवावयाला गेला(२.१३.२२.). राम आला, तेव्हा दशरथ रडत होता. त्याने 'राम' असा एक शब्द तोंडातून काढला. पुढे त्याला बोलवेचना. शोकाने आणि संतापाने विलक्षण दिसणा-या, आपणांकडे धड न पाहणा-या | बापाला पाहून राम आश्चर्यचकित झाला. रागावलेला असला, तरीही आपणांला पाहून मृदु होणारा आपला बाप आज मी पाया पडत असतानाही माझ्याशी || संस्कृती ।। १५