पान:Sanskruti1 cropped.pdf/13

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

| भावाभावांनी एकमेकांचे गळे कापण्याऐवजी त्यांना एकमेकांच्या गळ्यांतही पडता येते, हे रामायणाने दाखविले. संघर्ष निर्माण करून त्या संघर्षाच्या अनुरोधाने इतर बनाव रचणे हा महाभारताचा मार्ग, व संघर्ष निर्माण करून | भावाभावांच्या उदारपणामुळे व प्रेमामुळे कथेला एक अनपेक्षित कलाटणी देणे व संघर्ष संपवून टाकणे हा रामायणाचा मार्ग. रामकथा येथपर्यंत रंगत जाते, हे पूर्वी सांगितलेच आहे. पण पुढे मात्र मूळ कथेचे प्रयोजनच उरलेले नाही. ह्यामुळे रामायणाचा एक भाग दुस-याशी जोडलेला नाही. महाभारत व रामायण ह्यांच्या कथांतील मुख्य फरक हे दोन आहेत. एकीत मानवी संघर्ष व त्याचे भयंकर परिणाम, तर दुसरीत तसाच संघर्ष व उदात्ततेमुळे त्याचे निवारण, हा एक फरक. संघर्ष तीव्रतर होत गेल्यामुळे महाभारताची गोष्ट एकसंध व जिवंत वाटते; रामायणाची गोष्ट पुन्हा-पुन्हा एकमेकांशी संबंध नसलेले नवीन संघर्ष आणावे लागल्यामुळे विस्कळीत वाटते, हा दुसरा फरक.

                                                                 -१९७१

१० | || संस्कृती ।।