पान:Sanskruti1 cropped.pdf/102

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 हे नवीन मत मानवजातीचे अंतिम मूल्य होऊ शकेल का, ह्याचा विचार करण्याआधी एका गोष्टीकडे लक्ष वेधले पाहिजे. एका विशिष्ट दैवताच्या भक्तीवर आधारलेल्या दोन मतप्रणाली आपण पाहिल्या. त्यांचा धर्म इतर समाजांच्यापेक्षा वेगळा नव्हता. काय करावे, केव्हा करावे, कोणास भजावे, कसे भजावे, अशी अगदी रोजच्या व्यवहारातील तत्त्वे त्यांत सांगितली होती. पण बुद्धमत व शंकराचार्यांचे तत्त्वज्ञान व कम्युनिस्ट आणि इतर मतप्रणाली ह्यांच्या तत्त्वविषयक लिखाणात विशिष्ट आचारधर्माला मुळीच महत्त्व नाही. बुद्ध व शंकर व्यक्तीने निर्वाण व मुक्ती व त्यांद्वारे अंतिम सुख कसे मिळवावे, ह्याचा विचार करतात. बुद्धाची शिकवण व्यक्तीला होती; पण त्याच्या अनुयायांनी स्थापिलेला धर्म सांघिक होता, व व्यक्तीचे अंतिम ध्येय प्राप्त होण्यासही 'संघं सरणं गच्छामि' अशी संघानुसरणात्मक प्रतिज्ञा उत्पन्न झाली. शंकराचे तत्त्वज्ञान व्यक्तीगत राहिले; पण मोक्षाप्रत पोहोंचले. तरी सामाजिक कर्तव्य पार पाडली पाहिजेत, असे सांगून गीताटीकेच्यां मिषाने आचार्यांनाही थोडेसे समाजाभिमुख व्हावे लागले. पण शांकर तत्त्वज्ञान हे खरोखर व्यक्तीसाठी आहे, समाजासाठी नव्हे. ह्याउलट हल्लीच्या मतप्रणाली केवळ मनुष्यसमाजाचा विचार करतात. मानवी जगाच्यावर काही अज्ञात आधिदैविक शक्ती आहे, हा विचार त्यांना मान्य नाही. आपल्या विचाराला पुष्टी देण्यासाठी कोणत्याही दैवताचे आवाहन ते करीत नाहीत. ह्या जगात मानवसमाजाचे रूप कोणते असले म्हणजे मनुष्याचे हित होईल, एवढे फक्त ते पाहतात. कम्युनिस्ट समाजाच्या किंवा त्यातही एका विशिष्ट वर्गाच्या हिताकडेच जास्त लक्ष देतात. व्यक्तीच्या सुखाच्या व हिताच्या विचाराचा जवळजवळ लोप झालेला दिसतो. ह्याउलट इतर मतप्रणालीतून व्यक्ती व समाज ह्यांचे हक्क व कर्तव्ये कोणती, ह्याबद्दलचे सर्व विचार असतात. विशिष्ट आचारधर्माचा विचार आढळत नाही, तर समाजरचनेच्या तत्त्वांचा विचार आढळतो. निव्वळ आचारधर्म हा सापेक्ष आहे, असे आधुनिक समाजशास्त्रज्ञ व शासनशास्त्रज्ञ धरूनच चालतात. त्यामुळे ह्या विवेचनात परदाराहरण, परधनहरण, पतिभक्ती, पितृभक्ती वगैरेंना स्थानच नसते. पहिल्याने समाजरचनेच्या तत्त्वांचा ऊहापोह होतो, मग त्या अनुषंगाने क्वचित व्यक्तीगत आचारधर्माचे दिग्दर्शन होते.

।। संस्कृती ।।

९९