ग्रंथकर्त्याची प्रस्तावना या आपल्या अमर्याद विस्तीर्ण पोकळीमध्यें निर्मिकानें अनंत सूर्यमंडळांसह त्यांच्या ग्रहोपग्रहांसहित तत्संबंधी एकंदर सर्व प्राणीमात्रांस उत्पन्न केलें आहे. त्यापैकी आपण सर्व मानवस्त्रीपुरुषांनीं त्याविषयीं काय काय करावें आणि आपण सर्व एकंदर मानवस्त्रीपुरुषांनीं त्याचें स्मरण मनी जागृत ठेवून एकमेकांशी कोणत्या तऱ्हेचें आचरण केल्यामुळे त्यास आनंद होणार आहे; यास्तव मी त्याच्या कृपेनें एकंदर सर्व मानवस्त्रीपुरुषांच्या हितासाठी हा लहानसा ग्रंथ रचिला आहे. तो सर्वांस ग्राह्य होऊन आम्ही सर्वांनी निर्मिकाच्या सत्यमय राज्याचा सारखा उपभोग घेऊं लागावें म्हणून माझी त्यापाशी मागणी आहे. जें कांहीं मी माझ्या अल्पबुद्धीनुसार या ग्रंथांत लिहिलें आहे, त्यांत जी आमच्या मानवस्त्रीपुरुष विद्वान व सूज्ञ वाचणारांच्या ध्यानांत व्यंगे दिसून येतील, त्यांविषयीं त्यांनी क्षमा करून गुणलेशाचा स्वीकार करावा अशी त्या सर्वांस माझी विनंती आहे. आणि जर करितां त्यांच्या अवलोकनांत कोणताही भाग सार्वजनिक अयोग्य किंवा खोटा दिसला तो किंवा या ग्रंथाच्या दृढीकरणार्थ जर त्यांस कांहीं सत्य विचार सुचविणें असेल तर ते, त्यांनी वर्तमानपत्राद्वारे आम्हांस कळवावे, म्हणजे ते, खरेच विचारी पुरुषांचे असल्यास आम्ही कृतज्ञतापूर्वक मान्य करून दुसऱ्या आवृत्तींत दाखल करूं. हा ग्रंथ आम्हास विस्तारानें लिहावयाचा होता, परंतु एकंदर सर्व मानवस्त्रीपुरुषांस आपआपले प्रपंच आवरून जर हा ग्रंथ त्यांस वाचतां न येईल, तर एकंदर सर्व रिकामटेकडे धूर्त त्यांस लुटून खातील. यास्तव एकंदर सर्व मानवस्त्रीपुरुषांच्या उपयोगीं हा ग्रंथ पडावा म्हणून या ग्रंथास “सार्वजनिक सत्य धर्म पुस्तक" असें नांव दिलें आहे. यास्तव सर्वांनीं योग्य आश्रय दिल्यास दुसरी आवृत्ति आम्हांस, सुधारून व तींत नवीन पुराव्यासह कृत्रिमी थोतांडी ग्रंथांचे खंडण करण्याची हिम्मत येईल. ता. १ माहे एप्रिल सन १८८९ इ. पुणें } ग्रंथकर्ता
पान:Samagra Phule.pdf/४९४
Appearance