Jump to content

पान:Samagra Phule.pdf/४७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सत्यशोधक समाजोक्त मंगलाष्टकासह सर्व पूजा-विधि हे पुस्तक श्री. राम पटवर्धन यांनी महात्मा फुले : समग्र वाङ्मयाच्या पहिल्या आवृत्तीचे संपादक धनंजय कीर आणि डॉ. स. गं. मालशे यांना उपलब्ध करून दिले होते. १८८७ च्या जूनमध्ये नारायण मेघाजी लोखंडे यांनी प्रसिद्ध केलेल्या प्रथमावृत्तीत जोतीरावांनी रचलेल्या पाच मंगलाष्टकांचा समावेश केलेला आहे. याखेरीज सोमवार तारीख ४ फेब्रुवारी, १८८९ रोजी यशवंत जोतीराव फुले आणि लक्ष्मीबाई ग्यानोबा ससाणे यांच्या विवाह समारंभासाठी जोतीरावांनी रचलेली आणखी तीन मंगलाष्टके म्हणण्यात आली होती असे १० फेब्रुवारी, १८८९ च्या दीनबंधूवरून दिसते. यशवंत फुले व लक्ष्मी ससाणे या वधूवरांनी सत्यशोधक समाजाच्या पंचांकडून लग्नविधी करण्याची परवानगी घेतल्यावर प्रथम जोतीरावांचे कारकून गोविंद गणपतराव काळे यांनी पारंपरिक मंगलाष्टक म्हटले त्यात दशावतारांचा उल्लेख केलेला होता. जोतीरावांना दशावतारांची कल्पना मान्य नसल्यामुळे त्यांनी वधूवरांकडून त्या कल्पनेचे खंडन केले. (वधू) व्यापोनी जग सर्व राहसि असें नेणोनि हे मूढ रे । कच्छाच्या शरिरात तोचि अवघा हे मानिती हो खरे । इच्छेने अवघीच सृष्टि रचिशी रक्षीशि संहारिशी । ठेवाया सकलां समर्थ अपुल्या ताब्यात तूं आससी । सत्य मंगल-ध्यानीं धरा ॥ १ ॥ (वर) ऐसे तूं अवतार घेशी लटिके ऐसें मुखीं दुष्कृती । माराया खल दुष्ट रावण जगी निर्लज्ज ते बोलती । सर्वाचा अमुचा पिता असशि तूं माताहि दूजी नसो । यासाठी अमुच्या मनी अनुदिनी प्रीती तुझीची असो । सत्य मंगल ध्यानी धरा ॥ २ ॥ (वधू) वर्ताया सुपथीं आम्हास इषणा दे देवराया असे । जोडोनी कर दीन मी तव कृपादानास मागीतसे । नाही आकृति रुप जन्म तुजला ऐसें असोनी जनीं । तूं मत्सीउदरांत जन्मसि असें वाटे खलांच्या मनी । सत्य मंगल ध्यानी धरा ॥ ३ ॥ । महात्मा फुले : समग्र वाङ्मयाच्या चौथ्या आवृत्तीत वरील तीन मंगलाष्टकांचा प्रथमच समावेश केला.