या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
मामा परमानंद यांस पत्र ४२५ पांचगणीचे पाटील रामपासमक्ष आपल्यास शूद्र शेतकऱ्याचे दैण्यवाण्या स्थितीचा कांहीं देखावा जगापुढे आणणार, म्हणून कबूल केलें होतें. तें त्या देखाव्याचें असूड या नावाचें तीन वर्षांपूर्वी येक पुस्तक तयार केलें व त्याची येकेक प्रत आपले कलकत्त्याचे हरभास व अष्टपैलू गवरनर जनरल [साहेब व ?] श्रीमान महाराज बडोद्याचे गायकवाड सरकारास पाठविल्या आहेत. आमच्या शूद्रांत भेकडबाहुले छापखानेवाले असल्यामुळे तें पुस्तक छापून काढण्याचें काम तूर्त येके बाजूला ठेविलें आहे. असूडाची प्रत आपल्यास पहाण्याकरितां पाहिजे असल्यास त्याप्रमाणे लिहून आल्याबरोबर त्यांची नकल करण्यास लेखक बसवितों. नकल होण्यास सुमारें एकदोन महिने लागतील असा अदमास आहे. कळावें लोभ असावा ही विनंती. -समाप्त- आपला जोतीराव गोविंदराव फुले