पान:Samagra Phule.pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तृतीय रत्न महात्मा फुले समता प्रतिष्ठानतर्फे प्रकाशित होणाऱ्या "पुरोगामी सत्यशोधक' या त्रैमासिकाच्या एप्रिल-जून १९७९ च्या अंकात (वर्ष ५, अंक २) प्रथमच या नाटकाचे हस्तलिखित प्रकाशित झाले. नाटकाचे हस्तलिखित फुल्यांचे चरित्रकार पंढरीनाथ पाटील यांच्या खाजगी संग्रहात आढळले. हस्तलिखित प्रथम प्रसिद्ध झाले तेव्हा त्यासोबत प्रा. सीताराम रायकरांनी लिहिलेली एक छोटीशी प्रस्तावनाही प्रसिद्ध झाली होती. या नाटकाच्या हस्तलिखिताच्या एका प्रतीवर "तृतीय नेत्र" असे शीर्षक दिलेले आढळले. या नाटकाचे हस्तलिखित आपण “१८५५ सालात दक्षणा प्राईज कमिटीस अर्पण केले. परंतु तेथेही असल्या भिडस्त भटसभासदांच्या आग्रहामुळे युरोपियन सभासदांचे काही चालेना तेव्हा त्या कमिटीने माझी चोपडी नापसंत केली असा जोतीरावांनी "गुलामगिरी' पुस्तकात या नाटकासंबंधी उल्लेख केलेला आहे.