Jump to content

पान:Samagra Phule.pdf/४०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३६६ महात्मा फुले : समग्र वाङ्मय ब्राह्मण- महारमांगांस ब्रह्मो करण्याची ब्रह्मसमाजाची इच्छा आहे. पण त्याप्रमाणें आम्हां सर्व समाजियनांची खटपटही चालूच आहे. परंतु या कामी आपण सर्व शुद्रांनीसुद्धां आम्हांस मदत करूं लागलें पाहिजे, कारण आपण सर्व जेव्हां इराणांतून या देशात आलों, तेव्हां आपण सर्वांनीं येथील मूळच्या स्थाईक रहिवाशी महारमांगाचें सर्वस्व हरणं करून आपण येथील अधिपती झालों. शूद्र— यावरून आपल्या आर्य पूर्वज ब्राह्मणांनी इराणांतून हिंदुस्थानांत येण्याचे पूर्वी त्यांनी आम्हा शूद्रांचे पूर्वजांस दास केलें होतें. किंवा आर्यांनी इराणांतून हिंदुस्थानांत येतेवेळी आम्हा शूद्रांचे पूर्वजांस वाटेंतच दास करून येथें बरोबर घेऊन आले, किंवा तुम्हां आर्य ब्राह्मणांच्या पूर्वजांनी इराणांतून हिंदुस्थानांत आल्यावर आम्हां शूद्रांचे पूर्वजांस आपले दास केलें, यापैकीं खरें कोणतें, तें तरी चटकन कळू द्या ? आतां कां उत्तर देण्यास विलंब ? अहो, तुम्हीं ज्यापेक्षां आम्हां शूद्रांस दास व अतिशूद्रांस अनुदास करून आम्हा सर्वांस वंशपरंपरेनें हा काळ पावेतों छळीत आलां, त्याअर्थी आपण केल्या कर्माचा पश्चात्ताप मानून प्रथम मांगामहारांचे वाजवी मानवी अधिकार त्यांचे त्यांस देऊन त्यांजपाशीं तुमच्या पूर्वजांनी केलेल्या दुष्ट कर्माची क्षमा मागा. नंतर आम्हां अज्ञानी शूद्रांबरोबर सल्ला करण्याकरिता आल्यावर पुढें त्याविषयीं पहाता येईल. आतां आम्हांला तुमचे ब्रह्मसमाज व प्रार्थनासमाज नकोत. पुरे झाले तुमचे छक्केपंजे. ब्राह्मण - - उत्तर- आम्हांस जर मदत करण्याची आपली मर्जी नसेल, तर आपण तरी मांगामहारांस त्यांचे मानवी अधिकार समजावून त्यांस मार्गावर आणा, म्हणजे बरें होईल. शूद्र – तुमच्या पूर्वजांनी इराणांतून येऊन या देशांतील मूळच्या एकंदर सर्व रहिवाशी लोकांवर अनेक स्वाऱ्या केल्या. त्यांचें सर्वस्वी हरण करून ते (ब्राह्मण) त्यांचे अधिपति होऊन बसले. त्यांस आपले दासानुदास करून त्यांस विद्या शिकण्याची बंदी केली. त्यापैकी कित्येकांस स्पर्शसुद्धा करण्याचा निर्बंध करून त्यांचा सर्वोपरी छळ केला. त्याविषयीं तुमच्या पूर्वजांनी केलेल्या मनूसारख्या घाणेरड्या ग्रंथांत अतिक्रूर लेख सांपडतात. यावरून शूद्रादि अतिशूद्रांचा तुम्ही (आर्यांनीं) सर्वस्वी नाश केला, हे सर्व आपण डोळ्यांनी प्रत्यक्ष पहातों कां नाहीं बरें ? या तुमच्या पूर्वजांनी केलेल्या नीच कर्माचा मागमुद्दा नाहींसा व्हावा, म्हणून तुम्ही मांगामहारांस ज्ञान देऊन त्यांस तुम्ही योजून काढलेल्या समाजांत सरते करून घ्या. या कामी आम्ही शूद्रांनी तुम्हां आर्य ब्राह्मणांस मदत द्यावी ती कां ? तुमच्या पूर्वजांनी महारामांगांच्या मार्गांत पसरलेले कांटे तुमचे तुम्ही वेंचून काढा.