सत्सार, अंक १ पंडिता रमाबाईंनी २९ सप्टेंबर, १८८३ रोजी लंडन येथे हिंदु धर्माचा त्याग करून ख्रिस्ती धर्माची दीक्षा घेतली. १७ फेब्रुवारी १८८६, रोजी त्या इंग्लंडहून अमेरिकेला जाण्यासाठी निघाल्या. अमेरिकेत जवळजवळ तीन वर्षे राहून पंडिता रमाबाई १८८९ च्या फेब्रुवारीत मायदेशी परतल्या. परदेशातील वास्तव्यात रमाबाई ख्रिस्ती झाल्याची बातमी कळताच "इंदुप्रकाश”, “ज्ञानप्रकाश” सारख्या समाजसुधारणांची तरफदारी करणाऱ्या वृत्तपत्रांनी देखील "रमाबाई बाटली" रमाबाईने शेवटी फसविले" असा आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. "ज्ञानचक्षु", "पुणेवैभव" वगैरे वृत्तपत्रांनी तर रमाबाईंवर अपशब्दांचा वर्षाव केला. केसरीचे पहिले संपादक गोपाळराव आगरकर यांनी रमाबाईंच्या बुद्धीविषयी व धैर्याविषयी प्रशंसापर मजकूर १६ ऑक्टोबर, १८८३ च्या अंकात छापला होता. पण रमाबाईंनी धर्मांतर केल्याचे वृत्त खरे असल्याचा फादर रिव्हिंगटन यांनी वृत्तपत्रात पत्र छापून निर्वाळा देताच आगरकरांच्या केसरीनेही “पंडितेने सगळ्यानाच उत्कृष्ट रीतीने खासे चकविले" (केसरी ६ नोव्हेंबर, १८८३) असे लिहून इंदुप्रकाशकर्त्यांची री ओढली. ब्राह्मणी वृत्तपत्रांप्रमाणेच "शुद्रातील कित्येकांनी पंडिता रमाबाईंच्या नावाने आपले ऊर बडविले" तेव्हा रमाबाईंची कड घेऊन महात्मा फुल्यांनी १८८५ साली सत्सार, अंक १ व सत्सार, अंक २ प्रकाशित करून रमाबाईंच्या टीकाकारांवर झोड उठवली. सत्सारच्या पहिल्या अंकाच्या पहिल्या पानावर फुल्यांनी एक कटाव छापला आहे त्यात “ज्ञानप्रकाश”, “ज्ञानचक्षु”, “पुणेवैभव" या वृत्तपत्रांचा आडवळणाने उल्लेख केलेला आहे. सत्सारच्या पहिल्या अंकाच्या मलपृष्ठावर जोतीरावांनी सहीनिशी जी जाहिरात प्रसिद्ध केली आहे तीवरून दीनबंधू पत्राचे कर्ते नारायणराव लोखंडे यांच्याशी जोतीरावांचे बिनसले होते. असा समज होतो. 000
पान:Samagra Phule.pdf/४००
Appearance