महात्मा फुले यांचे मलबारींच्या दोन टिपणांविषयीचे मत ४ डिसेंबर, १८८४ बेहरामजी मेरवानजी मलबारी या समाजसुधारकाने बालविवाह आणि लादलेले वैधव्य या विषयावरची दोन टिपणे मे, जून १८८४ मध्ये व्हाइसरॉय लॉर्ड रिपन यांच्याकडे धाडली. ११ सप्टेंबर १८८४ रोजी हिंदुस्थान सरकारने ही टिपणे प्रांतिक सरकारांकडे तसेच काही नामवंत भारतीय पुढाऱ्यांकडे पाठवली आणि त्यांना मलबारींच्या टिपणांविषयीचे मत व्यक्त करण्याची विनंती करण्यात आली. मुंबई इलाख्यातील ६८ प्रमुख व्यक्तींनी मलबारींच्या टिपणांसंबंधी आणि विशेषतः बालविवाहास आळा घालण्यासाठी कायदा करण्याबद्दलच्या त्यांच्या सूचनेविषयी मत व्यक्त केले. ४७ जणांनी सरकारने कायदा करून किंवा अन्यप्रकारे हस्तक्षेप करू नये असे मत दिले तर जोतीराव फुले, लोकहितवादी, न्या. म. गो. रानडे वगैरेंनी सामाजिक सुधारणा घडवून आणण्यासाठी सरकारने कायदा करून सक्रिय भाग घ्यावा असे मत व्यक्त केले. महात्मा फुल्यांचा मूळ इंग्रजी अभिप्राय Selections From The Records of The Government of India in the Home Department No. CCXXIII Home Department Serial Number 3, Papers Relating to Infant Marriage And Enforced Widowhood In India (1886). या पुस्तकातून येथे उदधृत केलेला आहे. केंब्रिज विद्यापीठातील डॉ. रोझॅलिंड ओ' हॅनलन आणि डॉ. विद्युत भागवत यांनी हे उतारे उपलब्ध करून दिले आहेत आणि 'महात्मा फुले समग्र वाङमय' या ग्रंथाच्या चौथ्या आवृत्तीत ते प्रथमच समाविष्ट केले जात आहेत. मलबारींच्या टिपणाविषयी मत व्यक्त करताना जोतीरावांनी सरकारने एकोणीस वर्षांखालील मुलास आणि अकरा वर्षांखालील मुलीस लग्न करण्यास परवानगी देऊ नये असे सुचविले. सरकारला न जुमानता अल्पवयीन मुलामुलींचे विवाह साजरे करणाऱ्या मातापित्यांकडून दंड म्हणून कर वसूल करावा आणि कररूपाने गोळा झालेली रक्कम शूद्र व अतिशूद्र हिंदूंच्या शिक्षणासाठी खर्च करावी असेही फुल्यांनी सुचवलेले दिसते. विधवांच्या दुःस्थितीचे वर्णन करताना जोतीरावांनी आपले मित्र सदाशिव बल्लाळ गोवंडे यांच्या घरात स्वयंपाकीण म्हणून काम करणाऱ्या काशीबाई या ब्राह्मण बालविधवेची करूण कहाणी सांगितली आहे. नवजात अर्भकाचा खून केल्याबद्दल काशीबाईला सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली तेव्हा फुले कळवळले. विधवांनी मुले मारून टाकू नयेत तर नवजात अर्भकांना आपल्या हाती सोपवावे असे फुल्यांनी आवाहन केले. ही हकिकत सांगून विधवांचे केशवपन करण्यास न्हाव्यांना मनाई करावी असेही फुल्यांनी सुचवलेले आढळते.
पान:Samagra Phule.pdf/३८८
Appearance