२६४ महात्मा फुले : समग्र वाङ्मय इनामें वगैरे कमाविली व कित्येक तर शिंदे-होळकरांसारखे प्रतिराजेच बनून गेले होते. परंतु हल्ली त्यांचे वंशज अज्ञानी अक्षरशून्य असल्यामुळे आपआपल्या जहागिरी, इनामें गहाण टाकून अथवा खरेदी देऊन हल्ली कर्जबाजारी होत्साते कित्येक तर अन्नासही मोताद झाले आहेत. बहुतेक इनामदार जहागीरदारांस आपल्या पूर्वजांनी काय काय पराक्रम केले, कसकशी संकटे भोगिलीं यांची कल्पना मनांत न येतां, ते ऐत्या पिठावर रेघा ओढून अशिक्षित असल्यामुळे दुष्ट व लुच्चे लोकांचे संगतीने रात्रंदिवस ऐषआरामांत व व्यसनांत गुंग होऊन, ज्यांच्या जहागिरी गहाण पडल्या नाहीत, अथवा ज्यांस कर्जाने व्याप्त केले नाही, असे विरळाच. आतां जे संस्थानिक आहेत त्यांस जरी कर्जवाम नाहीं, तरी त्यांचे आसपासचे लोक व ब्राह्मण कारभारी इतके मतलबी, धूर्त, धोरणी असतात की, ते आमच्या राजेरजवाड्यांस विद्येची व सद्गुणांची अभिरुचि लागू देत नाहींत. यामुळे आपल्या खऱ्या वैभवाचें स्वरूप न ओळखून, आपल्या पूर्वजांनी केवळ आमच्या चैनीकरितांच राज्य संपादन केले असे मानून धर्माचे योगानें अंध जहालेले, राज्यकारभार स्वतंत्र रीतीने पाहण्याचे आंगी सामर्थ्य नसल्यामुळे केवळ दैवावर भार टाकून ब्राह्मण कारभाऱ्यांच्या ओंझळीने पाणी पिऊन दिवसा गोप्रदाने व रात्री प्रजोत्पादन करीत स्वस्थ बसतात. अशा राजेरजवाड्यांच्या हातून आपल्या शूद्र जातबांधवांचे कल्याण होण्याचा संभव विशेष, परंतु त्यांच्या मनांत जो विचार कधीही आला नाहीं व जोपर्यंत "ब्राह्मणो मम दैवत" हें दे त्यांच्या डोक्यांतून निघाले नाही, तोंपर्यंत कितीही कपाळकूट केली तरी ती व्यर्थच जाणार व इतकेही करून तसें करण्यास कोणी प्रवृत्त झाल्यास बाळपणापासून मनावर जाहलेल्या दृढ संस्कारामुळे या मतलबी धर्माचे विरुद्ध चार गोष्टी ऐकून त्यांचा विचार करणें त्यांस कोठून रुचणार ? व जवळचे कारभारी अगोदर अशा निस्पृह व खऱ्या जात्याभिमान्याची डाळ शिजू देणार नाहींत, तशांतून धैर्य धरून एकाद्यानें मला तशी सवड दिल्यास मोठ्या आनंदानें मी यथामति आपले विचार त्यांचेपुढें सादर करीन. असों, जगांतील एकंदर सर्व देशांचे इतिहास एकमेकांशी ताडून पहातां, हिंदुस्थानातील अज्ञानी व देवभोळ्या शूद्र शेतकऱ्यांची स्थिती मात्र इतर देशांतील शेतकऱ्यांपेक्षा निकृष्ट अवस्थेस पात्र होऊन केवळ पशूपलीकडचे मजलशीस जाऊन पोहचली, असे दिसून येईल. हा ग्रंथ अनेक इंग्लिश, संस्कृत व प्राकृत ग्रंथ व हल्लीचे अज्ञानी शूद्रादि अतिशूद्रांच्या दीनवाण्या स्थितीवरून रचिला आहे, हे सांगण्यास नको, असें सहाय्य घडल्यावांचून याची रचना करता आली नसती हे उघडच आहे. या ग्रंथांत जे कांही मी माझ्या अल्प समजुतीने शोध लिहिले आहेत, त्यांत आमच्या विद्वान व सूज्ञ वाचणारांच्या ध्यानांत जीं जीं व्यंगें दिसून येतील, त्यांविषयीं मला क्षमा करून गुणलेशांचा स्वीकार करावा, अशी त्यांस माझी विनंती आहे. आणि जरकरिता
पान:Samagra Phule.pdf/३०५
Appearance