२१९ १. गेले वर्षी या समाजाचे वाढदिवशी जे नियम सर्व सभासदांनी पसंत केले त्या नियमाप्रमाणें आपआपल्या शक्त्यनुसार वागण्यास सर्व सभासदांनी प्रारंभ करावा, म्हणून डाक्तर विश्राम रावजी घोले यांनी सूचना केली, ती सर्व सभासदांनी मान्य केली. त्याप्रमाणें दर आदितवारी संध्याकाळी ईश्वरोपासना आणि पंधरा दिवसांनी शनिवारी उपयुक्त विषयांवर व्याख्यान देण्याची सुरुवात झाली. २. तारीख १३ माहे नोव्हेंबर सन १८७५ इ. रोजी प्रिन्स आफ वेल्स यांची स्वारी या शहरीं आली, त्या दिवसीं सर्व सभासदांनी मोठ्या आनंदाने जमून त्यांचे आगमनप्रीत्यर्थ ईश्वराची प्रार्थना केली. रा. कृष्णरावांनी युवराजांविषयीं निबंध वाचला. नंतर रा. धोंडीराम नामदेव आणि कृष्णराव भालेकर या उभयतांनी युवराजांचे हिंदुस्थानदेशीं आगमन झालें, याविषयीं कांहीं नवीन पदें केलीं तीं सर्व जमलेल्या सभासदांपुढें गाऊन दाखविली. ३. अहमदाबादेस गेले सप्टेंबर महिन्यांत जलप्रलय होऊन हजारों लोकांवर अत्यंत मोठें संकट गुदरलें. त्यांची घरेंदारे, अन्नवस्त्रे अगदींच नाहींशी झाली. अशा समयी दुःखपीडित बांधवांस सहाय्य करावें म्हणून डाक्टर विश्राम रामजी घोले यांनी सूचना केली कीं, वर्गणीची यादी तयार करून समाजाचे सभासदांकडे आणि समाजाचे हितेच्छु लोकांकडे पाठऊन वर्गणी जमवावी. या सूचनेस रा. रा. रामचंद्रराव हरि शिंदे आणि दुसरे सभासदांनी अनुमोदन दिलें. सर्वांनी मोठे आनंदाने आपल्या शक्त्यनुसार वर्गणी दिली. एकंदर वर्गणी १९५ रु. जमली, ती अमदाबादेच्या कलेक्टरसाहेबांच्या मार्फत रिलीफ फंडाचे अधिकाऱ्यांस देण्याकरितां तसेंच इकडून सूचना केल्यावरून मुंबईतील सत्यशोधक समाजाचे सभासद व मित्रमंडळी यांचकडून १३० रु. वर्गणी जमा करून ती परस्पर अमदाबादेस पाठविली. ४. रा. रा. जोतीराव गोविंदराव फुले यांनी केलेल्या गुलामगिरी आणि ब्राह्मणांचे कसब या पुस्तकांच्या प्रत्येकी ५० पन्नास ५० पन्नास प्रती समाजास बक्षीस दिल्या. हीं पुस्तकें आणि समाजाचे नियम हीं श्रीमंत आणि राजे लोक यांजकडे पाठवावीं असें ठरलें. ५. रा. रा. राघवेंद्रराव रामचंद्रराव, ट्रान्सलेटर, हायकोर्ट यांस समाजाने ब्राह्मणाशिवाय लाविलेले विवाह कायदेशीर आहेत की काय, असे पत्राद्वारे समाजाचे अध्यक्ष यांनी विचारल्यावरून त्यांनीं कृपा करून असे विवाह कायदेशीर आहेत, याविषयीं कायद्यांतील अनेक प्रमाणे देऊन कळविलें, त्यांज बद्दल समाज त्यांचा फार आभारी आहे. ६. समाजाचे नियमांच्या एक हजार प्रती छापवून सर्व सभासद आणि मित्रमंडळीकडे पाठविल्या. ७. समाजांतील एका गरीब समासदाचे मुलाचे लग्नाकरितां फंडांतून ३० रुपये बक्षीस देण्याचें समाजानें कबूल केलें आहे आणि त्याशिवाय समाजाचेमार्फत सभासद व मित्रमंडळीकडूनही वर्गणी जमली आहे.
पान:Samagra Phule.pdf/२६०
Appearance