Jump to content

पान:Samagra Phule.pdf/२५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सत्यशोधक समाजाचा रिपोर्ट २१३ या प्रसंगी आम्हाला लिहिण्यास आनंद वाटतो की, आपल्या हल्लीच्या परमदयाळू सरकारने हिंदुस्थानात आगमन केल्यामुळे सर्व जातींच्या लोकांस विद्येचा सारखा लाभ व्हावा, या हेतूने गावोगावी विद्यालये स्थापिली. याच्या निःपक्षपाती व परोपकारी सर्व लहानथोर जातीच्या लोकांस विद्यालाभ करून घेण्याची संधी मिळाली व जरी या समयी लोकांचे अज्ञान अवस्थेमुळे व धर्माच्या वेड्या समजुतीमुळे शूद्र वर्गात विद्येची वृद्धी लोकसंख्येच्या मानाने फारच कमी आहे, यास्तव आपले लोकांत सुधारणा करण्याकरिता हे दिवस फार उत्तम आहेत. म्हणून अशी उमेद धरली पाहिजी की, आमच्या पैकी विद्वान सद्गृहस्थांनी आपले लोकांची आणि देशाची सुधारणा करणे आहे, तरी कृत्रिमी लोकांची भीती न धरिता मनाचा दृढनिश्चय करून सत्यास अनुसरून वर्तन करण्यास मागे घेऊ नये. जर घेतील तर आमचे शूद्र बांधवांची मानसिक दास्यत्वाचे कैदखान्यातून कधीही मुक्तता व्हावयाची नाही. ते पुन्हा अंधाररूप सागरात बुडाल्याप्रमाणे होणार आहे. याजकडे लक्ष देऊन जे करणे ते करावे. ह्या सत्कृत्यास आम्ही प्रथम परमेश्वराची आराधना करून आरंभ केला. नंतर हे सत्कृत्य त्या जगन्नियंत्या परमेश्वराच्या कृपेने हा काळपोवेतो दिवसानुदिवस उत्तम प्रकारे उर्जित स्थितीत येत आहे. पुढे जगाचा निर्माणकर्ता ते उत्तम स्थितीत आणील अशाबद्दल आम्ही त्याची अंतःकरणपूर्वक नम्रतेने प्रार्थना करितो. समाजाचे सभासद : रा. रा. रामेशट बापूशेट उरवणे, रा. विनायक बाबाजी डेंगळे, रा. रा. ग्यानु मल्हारजी झगडे, रा. कृष्णराव पांडुरंग भालेकर, रा. रा. जोतीराव गोविदराव फुले. (डॉ. आर. एम. पाटील, पुणे यांचे संग्रहातून) -समाप्त- नारायण तुकाराम नगरकर, सत्यशोधक समाजाचे चिटणीस.