पान:Paripurti.pdf/99

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
परिपूर्ती / ११३
 

सध्याची पिढी ययातीच्या प्रकृतीची आहे. गरीबगुरिबांना मरेपर्यंत पोटाची खळगी भरण्यासाठी संसारात राहावे लागते. त्यांना विषयनिवृत्त व्हावयाचे म्हणजे आत्महत्याच करावी लागेल; पण इतरही सर्व कितीही वय असले तरी मोठ्या आसक्तीने जगात वावरत असतात. “मा गृध्रः कस्यचित धनम।।" हा उपदेश फक्त धनाच्या चोरीपुरताच नाही, सर्व त-हेच्या चोरीबद्दल आहे. द्रव्याची चोरी क्षुल्लक आहे, पण दुसऱ्याच्या आयुष्याची चोरी भयंकर आहे व ती सर्व त-हेने, सर्व काळ आजच्या जगात चालली आहे. स्वत:च्या संसाराचा पसारा एवढा थोरला मांडून ठेवायचा की, वानप्रस्थाश्रमाची गोष्टच दूर, पण मरताना म्हातारपणाचे मूल दोन-चार वर्षांचे असावयाचे व थोरल्या मुला-मुलींचा जन्म बापाचा संसार आवरण्यात जायचा हे दृश्य कितीतरी कुटुंबात दिसते. वयाची ४०-४५ वर्षे बापाच्या संसारापायी घालविली म्हणजे वेळीच न मिळालेल्या सौख्याच्या आशेने अशी एखादी बाई वा पुरुष अवतीभोवती बघून दुसऱ्याच्या संसारावर दरोडा घालू पाहतात. जुन्या चोरीतून नव्या चोरीचा उगम होतो. जुन्या-नव्या पिढीत सत्तेचे, अधिकाराचे, सौख्याचे संक्रमण सुरळीत न होता दरोडेखोरीच्या वृत्तीने होऊ लागते.
 मुले व सुना मोठ्या झाल्या आहेत, त्यांना कुटुंब कसेही चालवू दे, आपण आता ह्या सर्वांतून मन काढून 'कौतुका'पुरते राहावे असे फार थोड्यांनाच वाटते. नव्या पिढीला जुनी पिढी कधी एकदा जाईल असे होते. जुनी पिढी आपले मानाचे व सत्तेचे स्थान सोडण्यास तयार नसते. मग निरनिराळे कायदे व नियम करून कोणाला वयाच्या पंचावन्नाव्या वर्षी तर कोणाला साठाव्या वर्षी सक्तीने 'सेवा (!)निवृत्त' करून सत्तासंन्यास घ्यायला लावतात व तेढीच्या वातावरणात नव-कलेवर स्थापना होते. एकीकडून सेवानिवृत्त झाले की, आपल्या बुद्धीचा व अनुभवाचा लिलाव राजरोसपणे सुरू होतो. खाऊनपिऊन सुखी असूनही म्हातारपणी आपल्या परिपक्व ज्ञानाचा फायदा समाजाला निरपेक्षपणे देणारे महात्मे विरळाच. ही झाली सामान्य माणसांची गोष्ट; पण ह्याहीवरच्या वर्गाची दशा तर सर्वस्वी ययातीचीच आहे. कार्यक्षम झालेल्या खालच्या पिढीच्या कर्तबगारीला मुळी वावच मिळत नाही. अशा तरुणांना एकामागून एक हाकलून देण्यात येते व जीर्ण कलेवर व अतिजीर्ण कलेवरे आपल्या जगन्नायकपदाला चिकटून बसतात. अनुयायांनी केलेला जयजयकार ऐकल्याशिवाय त्यांचे कान तृप्त होत नाहीत. हजारो भक्त समोर गोळा झालेले पाहिल्याशिवाय त्यांना चैन