पान:Paripurti.pdf/97

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
परिपूर्ती / १११
 

साहचार्य लांबते. नव-कलेवरांचे शरीरच फक्त घडावयाचे नसून त्यात संस्कृतीचा आत्मा ओतायचा असतो. हे कार्य झाले म्हणजे जुन्यांना मरायची मोकळीक असते.
 पण मरायची मोकळीक असली म्हणून मरायची तयारी थोडीच होते? आणि मरायची तयारी झाली तरी मरण हाकेसरसे का धावून येणार आहे? पूर्वकालीन वन्य समाजात जीवनाचा झगडा इतका तीव्र असे की, वयाच्या पन्नासाव्या वर्षांपर्यंत जगणारी माणसे नव्हतीच म्हटली तरी चालेल. आजही रानटी व भटक्या टोळ्या एक वस्ती मोडून दुसरीकडे निघाल्या की, वाटचालीतच म्हातारी-कोतारी मरून जातात व फक्त जवान नव-कलेवरे तेवढीच शिल्लक राहतात. पण नागसंस्कृतीने शेतीच्या जागेवर अन्नोत्पादन वाढविले, शरीराची दगदग कमी केली व मानवाच्या आयुष्याची मर्यादा शंभरापर्यंत जरी नाही तरी साठ-पाऊणशेपर्यंत वाढविली. अशा परिस्थितीत जुन्या म्हाताऱ्या पिढीने काय करावे असा प्रश्न येतो. एका शक्तीचा उदय झाला की दुसरी अस्तास जाते व अशा त-हेने जगरहाटी नियमबद्ध चालू राहते हे सांगण्याचा कालिदासाला फार षौक आहे. सूर्य उगवतो व चंद्र अस्तास जातो हे त्याचे नेहमीचे, सर्वस्वी बरोबर नसलेले, उदाहरण आहे. मराठी कविता 'नेमिचि येतो मग पावसाळा' म्हणून सांगते; पण मनुष्याच्या दोन पिढ्यांच्या उदयास्ताचे चक्र असे नियमबद्ध नसते. ते नियमबद्ध करावे लागते व तो नियम काय हे कालिदासानेच वर्णन करून सांगितले आहे. रघुवंशाचे राजे बाळपणी शिकत असत, तारुण्यात विषयोपभोग घेत असत, म्हातारपणी संन्यासवृत्तीने राहात व शेवटी योगद्वारे शरीराचा त्याग करीत, असे तो रघुवंशाच्या पहिल्या सर्गात थोडक्यात सांगतो, व त्याच्या स्पष्टीकरणाकरिताच की काय, आठव्या सर्गाच्या आरंभी रघूचे वर्णन करतो ते फार महत्त्वाचे आहे. अजाने लग्नकंकण सोडायच्या आतच रघूने त्याला राज्याभिषेक केला, नंतर राज्यकारभार नीट होत आहे, शत्रूपासून भय नाही व प्रजा एकनिष्ठ आहे हे पाहून रघूने सर्व विषयांचा स्वर्गसुख-- लालसेचासुद्धा- त्याग केला. तो अरण्यात निघालेला पाहून अजाने रडतरडत त्याच्या पायांवर लोळण घेतली व ‘मला सोडू नका' म्हणून विनविले. रघूने पुत्राच्या बोलण्याला मान दिला पण परत लक्ष्मीचा अंगिकार केला नाही. त्याने नगराबाहेर एका आश्रमात वास केला व तेथे इतर योगी आणि संन्यासी यांच्याबरोबर चर्चा करून, यमनियमप्राणायामादींचा अभ्यास