पान:Paripurti.pdf/96

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


११० / परिपूर्ती
 

बांधले व हाताला रेशमी फडके गुंडाळले. त्यांनी बलभद्राच्या, सुभद्रेच्या व जगन्नाथाच्या हृदयातले 'ब्रह्म' उर्फ प्राण काढून नव्या मूर्तीत घातले. नव- कलेवरांचे- देव कसले? 'कलेवरे'... रथात बसवले व देवालयाच्या प्रांगणातच 'कैवल्य वैकुंठ' म्हणून देवाचे स्मशानस्थान आहे तेथे दयित सेवकांनी नेले. त्या कूपात रथाचे लाकडी घोडे, लाकडी सारथी व देवांची जीर्ण कलेवरे ठेवून त्यांवर माती टाकली. देवाच्या पुजाऱ्यांनी नव्या विग्रहांची गर्भगृहात स्थापना केली. देवळाच्या बाहेरील प्रचंड पटांगणात लाखो यात्रेकरू 'नव-कलेवर' दर्शनाची वाट पाहात बसले होते. सकाळी दारे उघडताच लक्ष कंठांतून 'जय ठाकूरजी!', 'जय जगन्नाथजी!' असा जयजयकार झाला तो कैवल्य वैकुंठाच्या गर्तेतील शेकडो पिढ्यांच्या कलेवरांना ऐकू गेला असेल. जगन्नाथ गोल डोळ्यांनी भक्तांकडे बघत होता. सुभद्रा आपल्या हारातील मणी मोजीत होती. बलभद्र सरळसोट ताठ उभा होता. सोन्या-रुप्याच्या दक्षिणेचा वर्षाव होत होता. मेलेल्या देवाचे सुतक दयित व सेवकांनी पाळले. मुक्तिमंडपात त्यांनी क्षौर उरकले, जुना स्वयंपाकाची भांडी फोडून नवी आणली, घरचा अग्नी विझवून नवा अग्ना आणला. भितरेछ रोजच्याप्रमाणे दरवाजे उघडायला आले, पण त्याच्या तोंडावर मृत्यूची कळा होती. नव-कलेवरांच्या ओसंडून चाललेल्या उत्सवाला त्याची दादही नव्हती व पर्वाही नव्हती.
 जगात प्रत्यही हा 'नव-कलेवर' उत्सव चाललेला असतो. व्यक्ती मरतात, पण जीवजाती नव-कलेवर धारण करून अखंड असतात. शुद्ध जीवनातीत जुन्या व नव्या कलेवरांची भेटच होत नाही. कीटकांच्या बहुतेक जातींत 'नवयौवना'चा दिवस महाप्रयाणाचा ठरतो. कोशातून पतंग बाहेर पडतो व मादीच्या शोधार्थ उडू लागतो. मादीची गाठ पडली की, प्रेमाची मिठी मृत्यूचीच गाठ घालून देते. नर थोड्याच वेळाने मरतो व पक्ष्याच्या भक्ष्यस्थानी पडतो. नव्या पिढीच्या ओझ्याने भारावलेली मादी अंडी घालीपर्यंत जिवंत राहते व नंतर मरते. ही अंडी कधी पानावर, कधी झाडांच्या बुंध्यांत पोखरलेल्या भोकात, कधी चिखलाच्या घरात, तर कधी मेणाच्या बनलेल्या षटकोनी ‘अनवसर' घरात असतात. जुनी पिढा मरून नवी जन्माला येईपर्यंत 'अनवसरा'चा काळ फार मोठा, असतो. वरच्या पायरीवरल्या जीवजातीत मात्र जुन्या कलेवरांना नवीनांना जन्मदेऊन लहानाचे मोठे करावे लागते. मनुष्याच्या बाबतीत तर नव्या-जुन्यांचे