पान:Paripurti.pdf/95

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


परिपूर्ती / १०९
 

तीन लहान-लहान रथांत बसवून त्यांना ‘अनवसरघरां'त आणले.
 स्नानपूर्णिमेच्या दिवशी स्नान झाले की संध्याकाळी जगन्नाथ आपल्या भावा-बहिणीबरोबर मुख्य गर्भगृहात न जाता अनवसर मंडपात जातो व देवालयाचे दरवाजे बंद होतात. स्नानामुळे धुवून गेलेला रंग व मुखवटा नवा चढवतात तोवर देव भक्तांना दर्शन देत नाही म्हणून 'अनवसर' असतो व त्या काळात राहण्याचे ठिकाण ते 'अनवरसघर' ऊर्फ 'मंडप.'
 इकडे मूर्ती घडत असता जुन्या विग्रहांचे उपचार व भोग रोजच्याप्रमाणे चालू होते. स्नानपूर्णिमेच्या दिवशी तिन्ही मूर्तीचे भक्तांचे देखत स्नान झाले व नेहमीप्रमाणे तिघेही अनवस घरात गेली. सुभद्रा वाट पाहात होती की, आता दैत सेवायत येऊन आपल्याला दरवर्षीप्रमाणे नवलावण्य देतील म्हणून; पण आज काही निराळाच प्रकार होता. रथांचा आवाज ऐकू आला व तीन नवीन मूर्तीना आणून जुन्या मूर्तीसमोर उभे केले. आता प्रश्न जन्मांतरीच्या आठवणीचा नव्हता, प्रत्यक्ष जन्मांतरीचे दृश्यच डोळ्यांसमोर होते. बारा वर्षे का अकरा वर्षे झाली बरे त्या गोष्टीला? ह्याच अनवसरघरात आपणही रथात बसून आलो होतो. नव्हे का? आपल्यासमोर धुपलेल्या मूर्ती फिकट तोंडाने उभ्या होत्या. पुढे काय होणार ह्याची तिला कल्पना नव्हती, पण तिचे हृदय मरणाऱ्या पतंगाप्रमाणे फडफड करीत होते. तिने कृष्णाकडे पाहिले, पण तिच्याकडे तो पाहत नव्हता. तिने बलरामाला 'दादा' म्हणून हाक मारायचा प्रयत्न केला, पण तोंडातून शब्दच उमटेना.
 ठाकूर जगन्नाथ निश्चळ शरीराने व निश्चळ डोळ्यांनी पाहात होता. पुढे ठेवलेल्या कलेवरांना रोज हळूहळू रूप येत होते. जगन्नाथाच्या समोरचे लाकूड जगन्नाथासारखे, सुभद्रेच्या समोरचे सुभद्रेसारखे व बलरामापुढचे बलरामासारखे दिसू लागले. त्यांना वस्त्रप्रावरणादि शृंगार होऊ लागला, पण ता अजून 'कलेवर' होती. त्यांना प्राण नव्हता. जगन्नाथाच्या नाशिवंत शरीरातील अक्षर आत्म्याचे नवे घर घडत होते. समाधिस्थ स्थितीतील जगन्नाथाला दिसत होते की कालचक्र फिरत आहे. दर फेऱ्याला आपला आत्मा 'नव-कलेवरा'त प्रवेश करीत आहे. आतापर्यंत अशी अनंत कलेवरे होऊन गेली. भविष्यात पाहिले तो दृष्टी पोहोचेपर्यंत नवनव्या कलेवरांची मालिका दिसत होती. ह्या चक्रातून, नवनव्या देहांतून सुटका नाही का? शेवटी महाप्रयाणाची रात्र उगवली. अवसेच्या रात्री विद्यापतीचे वंशज पति महापात्र' अनवसरघरात आले. शेजारच्या सेवायतांनी त्यांचे डोळे