पान:Paripurti.pdf/93

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
परिपूर्ती / १०७
 

भावना होते. ह्या मूर्ती लाकडाच्या ओंडक्यांच्या बनवलेल्या आहेत. दरवर्षी ज्येष्ठी पुनवेला त्यांना सर्वांगस्नान घालतात. त्या मूर्तीच्या तोंडाचा रंग धुवून जातो. देवळाचे दरवाजे बारा दिवस बंद असतात. देवाचे दैता (दैत्य) नावाचे सेवक मूर्तीना मुखवटा चढवून तो रंगविण्यात गुंतलेले असतात. मुखवटे रंगवून झाले की, देवांना नवा साज चढवतात व मूर्ती मंदिराबाहेर आणून तीन निरनिराळ्या रथांत ठेवतात आणि जगन्नाथाच्या रथयात्रेला प्रारंभ होतो. रथयात्रेच्या आदल्या दिवशी नवा रंग दिलेल्या मूर्तीचे भक्तांना दर्शन होते. ह्या दर्शनाला 'नवयौवन' दर्शन म्हणतात. सुभद्रा गुंतली होती ती ह्याच स्वप्नात. वर्षभर पुजून पुजून जुने झालेले तोंड धुऊनपुसून स्वच्छ होईल; बारा दिवस चेहऱ्याची रंगरंगोटी चालेल; नंतर 'नेत्रोत्सवा'च्या दिवशी डोळे रंगवतील; मग महावस्त्रे अंगावर चढवतील आणि मंदिराचे दरवाजे उघडले म्हणजे हजारो लोक एकमेकांना ढकलीत, चिरडीत माझे 'नवयौवन' निरखतील असे ती मनात म्हणत होती-
 पण जगन्नाथाचे मन सुचिंत नव्हते. चैत्री पूर्णिमेला ‘दयिता' सेवक 'बसेली' देवीच्या मंदिरात गेले होते. त्यांना नवघटस्थापनेचा कौल मिळाला होता व त्यांनी ‘बसेली'च्या गळ्यातील माळ देवीच्या अनुमतीचे निदर्शक म्हणून 'भितरेछ' महापात्राच्या स्वाधीन केली होती, इतकी हकीकत पुजाऱ्यांच्या बोलण्यातून त्याने ऐकली होती. त्याच्याही आधी "यंदा अधिक आषाढ आहे' हे वाक्य प्रत्येकाच्या तोंडी होते. 'अधिक आषाढ' ह्या शब्दांनी देवाच्या मनात हुरहूर उत्पन्न झाली होती; जणू जन्मांतरीच्या स्मृती जागृत होत होत्या.
 खरोखरच 'अधिक आषाढ' हे शब्द जन्मांतरींच्या स्मृती जागृत व्हाव्यात असेच होते. वीस वर्षांत जेव्हा अधिक आषाढ येतो तेव्हा जगन्नाथाच्या देवळातील मूर्ती नव्याने बनतात. आज वैशाख पूर्णिमा; सकाळी पाच वाजता भितरेछ महापात्र नेहमीप्रमाणे आले व त्यांनी देवळाचे दरवाजे उघडले. सिंहद्वारामागून एक एक दार उघडीत शेवटी गर्भगृहाचे दार उघडले. महापात्र किंवा नुसते पात्र असे नाव उडिशात पएकळ ब्राह्मणांचे असते. 'भितरेछ' म्हणजे 'अभ्यंतरेश' असावे असे दिसते ह्यांच्याकडे देवळाच्या आतील सर्व व्यवस्था असते. देवाचे नवे करावयाचा हुकूमही तेच देतात. आज गर्भगृहाचे दार उघडबरोबर ते आत आले, देवाच्या पायांवर त्यांनी डोके ठेवले. मग