पान:Paripurti.pdf/89

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०२ / परिपूर्ती
 

(घड्याळाप्रमाणे!) निरनिराळ्या कालसंवेदना एकसमयावच्छेदेकरून होत असतात.
 संवेद्य काळ हा इतक्या विविध त-हेने जाणवतो की, काळ ही काय चीज आहे ते सांगणेच कठीण होते. मग मनुष्याने ह्या काळाशी दिशेचे लग्न लावून साधले काय? ह्याचे उत्तर काठक संहितेत एका अतिलघू व अतिरम्य कथेत दिले आहे (ही कथा श्री.श्रोत्रियांच्या 'वेदातील गोष्टी' ह्या लहान मुलांसाठी लिहिलेल्या पुस्तकात मी पहिल्याने वाचली.) ती कथा अशी; पहिल्याने फक्त दिवसच होता. रात्र नव्हती. यमीला भावाच्या मरणाचे दु:ख सहन होईना. देवांनी तिला विचारले, “यमे तुझा भाऊ कधी गेला?" म्हणजे तिने म्हणावे, “आजच. मग देवांनी विचार करून रात्र उत्पन्न केली. रात्रींमागून दिवस व दिवसांमागून रात्री गेल्या व यमी (काळ गेला हे जाणून) भावाचे दु:ख विसरली- यमीला भावाचे दु:ख विसरायला लावायची देवांची युक्ती सफळ झाली. पण देव झाले तरी मानवाचे पूर्वजच ना! मनुष्य काहितरी मनात योजून कृती करीत असतो. त्या कृतीपासून त्याला हवे ते कधीकधी मिळतेही; पण मनुष्याची प्रत्येक कृती इष्टफलाबरोबरच नेहमीच आयोजित अकल्पित फळही देत असते. असेच अगदी ह्या देवांच्या युक्तीचे झाले सर्व जगातील दुःख सह्य झाले खरे, पण त्याबरोबर सुखही क्षणभगुर झाले. वनवासात दु:खात काळ कंठणाऱ्याला “हेही दिवस जातील' हा मंत्र सुखाचा वाटला खास, पण हुमायूनाचे मन गादीवर बसल्यावर ह्या उक्तीचा आठवणीने विषण्ण झालेच असले पाहिजे. काळ जातो आहे, क्षण नष्ट होता आहेत- दिवस मावळतो. रात्र सरते, पण त्याबरोबर आयुष्य झरते, सुखाला ओहोटी लागते. काळ झपाट्याने जात आहे ह्या भावनेने फक्त यमी काय ती सुखी झाली. पण त्याच क्षणभंगुरत्वाच्या जाणीवेने मानवी सुखात कायम विष कालवले ना? सुखाच्या प्रत्येक क्षणाला, “देवा, हा क्षण माझ्या आयुष्यातला शेवटलाच ठरो' हे मागणे आपण उत्कटतेने मागतोच ना? सर्व वेदान्त, सर्व आरोग्यपर तत्त्वज्ञान म्हणजे जाणीवेचेच फळ ना? दुख विसरायला काळाला दिशेचे बंधन घातले आणि मग जेव्हा ह्या कालचक्रात सापडून मानव अगतिक झाला त्यावेळी, कधीही नष्ट होणाऱ्या चिरंतन तत्त्वाच्या शोधाला लागला. ह्या चिरंतन तत्त्वाचे उपनिषदात जागोजागी जे वर्णन आढळते ते दिङनिरपेक्ष स्वसंवेद्य काळाचेच असावे असे मला वाटते.