Jump to content

पान:Paripurti.pdf/82

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
परिपूर्ती / ९५
 

मूळ संवेदनेचे स्वरूप आपण पार विसरून जातो व मूळ जाणिवेला माहीत नसलेले कित्येक गुणधर्म काळाला चिकटवतो. हेच आपले कालविषयक ज्ञान!
 काल सार्वजनिक केल्यामुळे तो सारखा एकजिनसी आहे व व्यक्तिनिरपेक्ष आहे असे मानणे अगदी चूक आहे. व्यावहारिक कालमापन सूर्याच्या आकाशातील स्थलांतरावर आधारलेले आहे. सूर्याचे स्थलांतर वास्तविक एक भास वा माया आहे व ही माया पृथ्वीच्या दैनंदिन गतीमुळे उत्पन्न होते. जेव्हा पृथ्वी तरुण पोर होती तेव्हा आतापेक्षा कितीतरी जास्त वेगाने आपल्याभोवती गिरक्या घेत होती. तिचा गिरक्या घेण्याचा वेग सारखा मंदावत आहे आणि जेव्हा ती आणखी वयस्कर होईल तेव्हा तिचा वेग हल्लीपेक्षा कितीतरी मंदावेल, आणि जेव्हा बिचारी मरणोन्मुख आणि जराजर्जर होईल तेव्हा तिच्या गाऱ्या-गाऱ्या भिंगोऱ्या पूर्णतया थांबतील. पृथ्वीवरील दिवस सारखा लांबतो आहे व एक वेळ अशी येईल की, काहींना अनंत दिवस मिळेल तर काहींना अनंत रात्रीच्या भयाण अंधारात कुजावे लागेल. तेव्हा सार्वजनिक काळ ही काही कधी न बदलणारी सर्वनिरपेक्ष अशी चीज मुळीच नाही, किंवा कोणत्या तरी शकाप्रमाणे कालगणना करू म्हटले तरी तीसुद्धा सर्वस्वी सांकेतिक व बरीचशी अनिश्चित अशी राहते. ज्या व्यक्तीच्या जन्मावरून शकगणना होते त्या व्यक्ती कधी जन्मल्या हेच नक्की माहीत नसते. शालिवाहन व विक्रम हे कधी झाले, ते खरोखरीच्या व्यक्ती होते की केवळ काल्पनिक पुरुष आहेत ह्याबद्दलच मुळात शंका आहे. ख्रिस्ती शकाची तीच कथा. बरे, ही शकगणना खरी म्हणून मानली, तरी ती जीवर आधारलेली आहे ती व्यक्ती कधी जन्मली? अशी विचारणा केली तर त्याचे उत्तर धड देता येत नाही. अर्थात ही कालगणना निरुपयोगी असे मी म्हणत नाही, पण ती असावी तितकी व्यक्तिनिरपेक्ष व दोषरहित नाही हे खास. जेथे अशा कालगणनेचा उपयोग असेल तेथे अवश्य करावा, पण सवच वैयक्तिक कालगणना त्यावरून करण्याचा आग्रह का? माझा शास्त्रज्ञ नवरा म्हणतो, “तुम्हा बायकांना कोणतीही घटना कधी झाली म्हणून विचारलं तर तुम्ही त्याचं कधी नीट शास्त्रशुद्ध उत्तर देणार नाही. अमक्या साली, अमक्या महिन्यात, अमक्या तारखेला, इतक्या वाजता असं कधी तुम्ही सांगतच नाही-- काय तर म्हणे, 'जाई शाळेत जाऊ लागली तेव्हा नंदू