पान:Paripurti.pdf/77

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


परिपूर्ती / ८९
 

आनंदाखेरीज कसलीच देवाणघेवाण करण्याची तसदी नव्हती. महारांना माणसा-माणसांच्या संबंधाचे ज्ञान उपजत असते असे मी म्हणते ते ह्यामुळेच. ज्या गोष्टी आम्हाला शिकाव्या लागतात त्या त्यांना आधीच माहीत असतात आणि त्या बोलून जाण्याची त्यांची पद्धत इतकी सहज, सरळ व बिनतोड असते की, त्याच्यापुढे उत्तरच नसते. माझ्या प्रवासात मी जवळजवळ मराठी मुलुखाची सीमा गाठली होती. पुढे जावे का नाही हे अजून ठरले नव्हते. रम्य वनप्रदेश, साधे-भोळे, निरक्षर, मला पूर्वी माहीत नसलेले मराठी बोलणाऱ्यांचे समाज ह्यात मन रमले होते. पण घर सोडून फार दिवस झाल्यामुळे घरची ओढ लागली होती. महाराष्ट्राची सीमा कोणती ह्याबद्दल आमचे बोलणे चालले होते. कोणी म्हणत होता, “ह्या नदीच्या पलीकडे हिंदी बोली सुरू झाली;" कोणी म्हणत, "त्या गावातले लोक निम्मे मराठी, निम्मे हिंदी आहेत." महार पटवारी म्हणाला, "जेथपर्यंत महार पोचले तिथपर्यंत महाराष्ट्र!"