Jump to content

पान:Paripurti.pdf/76

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८८ / परिपूर्ती
 

उत्तर न सुचल्यामुळे सर्वांनी माझ्याकडे वळून "मग बाई..." अशी सुरुवात केली. पण माझ्या सुदैवाने गावचा पोलीसपाटील तेवढ्यात येऊन सर्वांना काही कामाला घेऊन गेला, व मी त्यांच्या प्रश्ना-राक्षसांच्या तावडीतून सुटले.
 ह्यापुढचा मुक्काम खजरी येथील हाळबी जमीनदाराकडे होता. तथला पटवारी एक हुशार, मध्यम वयाचा व अर्थातच लिहिता-वाचता येणारा महार होता. नेहमीप्रमाणे त्याने माझी सर्व व्यवस्था केली व आम्ही जेवावयास बसलो. मला अर्थातच स्पृश्यास्पृश्यतेचा प्रश्न नव्हता. पण बरोबर काही इतर गावकरी होते. पटवाऱ्याने कोळ्याकडून पाने अशा खुबीने मांडली की लहानशा ओसरीवर साधारणपणे वर्तुळात एकमेकांपासून दूर... दूर... सर्वजण तर एकत्र आणि कोणी कोणाच्या पंक्तीत तर नाही... अशी आम्ही बसलो व जेवणे झाली. हा गृहस्थ दोन दिवस माझ्याबरोबर हिंडवयास होता. त्याच्या गप्पा, त्याचा अनुभव, मोकळेपणाने वागूनही कधी चुकून मर्यादेचा अतिक्रम न करणे ह्या गुणांनी मला त्याच्याबद्दल आपुलकी वाटू लागली.
 माझ्या मनात सारखे येई... त्याच्या मलांना खाऊसाठी म्हणून काही द्यावे. पण ज्या माणसाबरोबर बरोबरीच्या नात्याने दोन दिवस काढले त्याला अशा प्रकारे उचलून पैसे द्यावे हेही मनाला प्रशस्त वाटेना. दुपारी रक्ततपासणीचे काम चालले होते. माझ्याजवळ दोन-चार काचेच्या नळया मागे रबराचा फुगा लावलेल्या अशा रक्त घेण्यासाठी होत्या. त्यांची पेटी उघडून माझे काम चालले होते. पटवारी म्हणाला, “बाई, तुमच अडणार नसेल तर एक नळी द्या. फाऊंटन पेन भरायची भारी पंचाईत पडते." त्यांच्याबरोबरच साकोरीपासून वाटाड्या म्हणून पाठवलेला एक ब्राह्मण होता, तोही आमच्यात गेले चार दिवस होता. तो म्हणाला, "अहो, असं मागता काय... मला पण फाऊंटनची अडचण पडते, पण मी मागितल का?" पटवारी म्हणाला, "त्यांत काय झालं? बऱ्याचशा नळ्या दिसल्या. एक मागितली; अडणार नसेल तर घेतली, नाही तर नाही." पटवाऱ्याने क्षुल्लक वस्तू आपण होऊन अगदी सहजगत्या मागण्यात कोणतेच दैन्य दाखवले नव्हते. उलट, दोन दिवसांच्या सहवासात उत्पन्न झालेल्या खेळीमेळीच्या, बरोबरीच्या भावनेचे ते द्योतक होते. मागणी ऐकून मला पण आनंद झाला. देणगी इतकी क्षुल्लक की. देणाऱ्याला व घेणाऱ्याला