पान:Paripurti.pdf/75

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


परिपूर्ती / ८७
 

मिळतात. तेवढंच त्याचं पोट बाहेर पडतं." त्या मुलाचे केविलवाणे डोळे, त्याच्या आईचे कित्येक दिवसांत वेणी न घातलेले डोके, कित्येक दिवसात न धुतलेले लुगडे व माझ्याशी बोलताना सुद्धा चाललेला पाने कातरण्याचा उद्योग ही सर्व माझ्या डोळ्यांपुढे उभी राहिली. खरेच, महाराच्या घरी तान्ह्या मुलाखेरीज सगळे कुटुंबच्या कुटुंब पैसे मिळवीत असते. चार पैसे मिळाले की, खर्च होण्यासही वेळ लागत नाही. शेजारच्या मोठ्या शहरी जायचे, बाजारात छानछोकीची जी वस्तू दिसेल ती दुप्पट पैसे देऊन विकत घ्यायची, चार दिवस निरनिराळ्या उपाहारगृहात जाऊन मन मानेल तसे चरायचे, यथेच्छ दारू प्यायची, तमाशाला जायचे आणि खिसे मोकळे झाले की घरी येऊन घाण्याला जुंपलेल्या बैलाप्रमाणे कामाला लागायचे. गाडीतल्या पांढरपेशा माणसांना ह्या आयुष्यक्रमाचा का बरे एवढा हेवा वाटावा?
 भंडाऱ्याच्या पुढे हाळबी लोकांच्या प्रदेशात माझे ह्यापुढील काम होते. तेथे अर्जुनीला दोन-तीन दिवसांचा मुक्काम होता. शेजारच्या दोन-चार गावांतून महारांना बोलावले होते. तेथेही नागपूरचाच अनुभव मला आला. गोंड, हाळबी, कुणबी मापे देऊन रक्त देऊन जात होते. पण मी हे काय चालवले आहे हे काही कुणी विचारले नाही. महार आले ते सगळे मिळून चार-पाच मैल चालून आले. त्यांनी मापे घेताना मी डोके का मोजते हे विचारले, सरकारांतून त्याबद्दल मला काय मिळते ते विचारले, किती रिक्रूट पाठवले तर किती कमिशन मिळते ते विचारले. शेवटी माझे काम रिक्रूट भरतीसाठी नाही ह्याची खात्री पटल्यावर दोन क्षण मोजणीचे काम पूर्ण शांततेत झाले. मला वाटले, संपली ह्यांची प्रश्नावली. पण छे! रिक्रूट भरतीसाठी तर नाही, पण मग ही मोजणी कशासाठी चालवली आहे ते समजावून सांगण्याची भुणभुण सुरू झाली. शेवटी अगदी निरक्षर माणसांना मानवशास्त्राचे धडे देण्याइतपत माझी तयारी आहे का नाही ह्याची परीक्षा मला देण्याची वेळ आली. रक्त काढल्यावर मला जेवायचे होते. ते रक्त मीच तपासणार हे कळल्यावर तर मंडळी तेथून हलच ना. “तुम्ही काय करता ते आम्ही पाहू न मग जाऊ" असे त्यांनी निक्षून सांगितले, व मग माझ्याभोवती कोडाळे करून कोणाचे रक्त 'अ' आहे, कोणाचे 'ब' आहे, ते कसे ओळखायचे, ह्याची समजूत करून घेतली. “काय रे मग बामणाचं रक्त न आपलं रक्त सारखं आसलं तर काय होईल?" “मग म्हणून काय झालं? आम्ही काय माणसं नाहीत?"' “अरे, पण निराळं असलं तर रे?" ह्याला