पान:Paripurti.pdf/74

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८६ / परिपूर्ती
 

आहे. आणि मग सार्वत्रिक निवडणुकीत आंबेडकरांच्या माणसाचा धुव्वा ठरलेलाच आहे. पैसा मात्र खूप खर्च होणार आहे." हे ऐकून एक गृहस्थ म्हणाले, “काय भाव चढला आहे आज त्यांना!” “रोज अडीच रुपयालासुद्धा काम करायला तयार नाहीत ते.” शेवटचा माणूस म्हणाला.
 गोंदिया-भंडाऱ्याच्या बाजूला देशी बिड्या प्रचंड प्रमाणात करतात. त्यासाठी जी टेंभुर्णीची पाने लागतात ती गोळा करणाऱ्या हंगामाला अजून नीटशी सुरुवात झाली नव्हती. पण लवकरच काम सुरू व्हावयाचे होते. हिवाळा संपून नवी पात फुटली की, जास्तीत जास्त पाने गोळा करून आणण्याची धांदल सबंध जंगल प्रदेशात उडालेली असते. विडी कारखान्यातील कामे- पाने गोळा करणे, ती निवडणे, कातरून त्यांना आकार देणे, ती वाळवून पुडे बांधणे, विड्या वळणे वगैरे सर्व महारच करतात. घरातील पुरुष उजाडण्याच्या आतच कारखानदारांच्या रिंग्या घेऊन रानात जातात. तेथे सूर्य उगवल्यापासून मावळेपर्यंत पाने ओरबाडण्याचे काम चालते. जसजशा गाड्या भरतात तसतशा त्या मालक सांगेल त्या त्या ठिकाणी रवाना होतात. तेथे म्हातारे-कोतारे, बायका-पोरे दिवसभर पाने कातरीत असतात. दिवसाचा वेळ फुकट जाऊ नये म्हणून बायका रात्रीचाच दळणे करून भाकरी भाजून ठेवतात. मी कार्यकर्त्यास- विडी कारखानदाराच्या आश्रितास- विचारले, “महारांना दिवसाचे किती तास काम पडते हो?" तो उत्तरला, “तास कसचे विचारता? हंगामात दिवसाचे बारा तासही कामाला पुरत नाहीत. पाने आणणे, कातरणे, पुडे बांधणे वैगेरे निरनिराळ्या कामाप्रमाणे दाम मिळतो त्यांना. आजकाल फारच शेफारले आहेत ते." दुसरा एकजण म्हणाला, “आणि एकेकाचा पोशाक तरी पाहा. कोशा, सिल्कचा शर्ट व सोन्याच्या रिस्टवॉच! दिसतात का तरी तुम्हाआम्हाला?" तिसरा बोलला, "अहो, त्यांचं सगळं कुटुंबच्या कुटुंब पैसे मिळवतं ह्या दिवसांत.' मत्सराचा एक सामुदायिक ध्वनी गाडीत उमटला.
 मला माझ्या प्रवासातली एक सकाळ आठवली. रानातून प्रवास करीत असता मी महारांच्या वस्तीला आले होते. घराच्या पुढेच एक अशक्त व फिक्कट दिसणारा मुलगा पानांची रास पुढे घालून बसला होता. त्याच्या आईने सांगितले, "बाई, तो अशक्त आहे, त्याचे पाय लुळे आहेत, चालता येत नाही. पण बसून पानं कातरली म्हणजे दिवसाचे आठ-बारा आणे