पान:Paripurti.pdf/72

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८४ / परिपूर्ती
 

आम्ही घरी चाललो होतो. रस्त्याने फारच थोड्या माणसांची आवकजावक होती. एवढ्यात एका वळणावर खड्या सुरात म्हटलेले गाणे ऐकू आले. वळण संपल्यावर पाहिले तो तिघे-चौघेजण सावकाश रमतगमत चालले होते. एकजण गाणे म्हणत होता. बाकीचे मधूनमधून साथ करीत होते व मधूनमधून गप्पा मारीत होते. आम्ही झपाझप चाललो होतो. आम्ही जवळ आलो तो गाणे थांबले. मी विचारले, “कसलं गाणं चाललं होतं? सर्वांनीच चमत्कारिकपणे माझ्याकडे पाहिले, पण उत्तर दिले नाही. काय एवढेसुद्धा माहीत नाही? आम्हाला सांगायची जरूरी नाही, असाच भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसला. थोडे लांब गेल्यावर बरोबरच्या गृहस्थाने सांगितले की, “ते महार होते... आंबेडकरांचा पोवाडा चालला होता. ते पुढे म्हणाले, “उगीच बोललात तुम्ही त्यांच्याशी." पण मला तसे वाटले नाही. शब्दांनी न बोलता त्यांना काय सांगायचे होते ते त्यांनी अगदी स्पष्ट सांगून टाकले होते.
 दुसऱ्या दिवशी मी ज्या जहागीरदाराकडे उतरले होते. त्यांच्याकडे गावचा महार काही कामासाठी आला होता. त्याने प्रत्येकाला लवून जोहार केला. जहागीरदारांच्या सांगण्यावरून “माप देण्यासाठी माणसे ताबडतोब लावून देतो" असे त्याने मोठ्या अगत्याने सांगितले. इतक्यात मला त्याची काठी दिसली. काठी कळकाची, धुराने लालसर काळी झालेली अशी होती.. तीवर पितळेच्या तारेने हरत-हेने विणून नक्षीकाम केले होते. मी काठी मागितली तेव्हा त्याने वाकून लांबून माझ्या हातात ती टाकली. स्वतः जहागीरदार व त्यांचे चिरंजीव अस्पृश्यता मानणारे नव्हते. मी तर त्यांच्यादेखतच एका महाराचे माप घेतले होते, मग काठी लांबून माझ्या हातात टाकण्याचे प्रयोजन काय? मी म्हटले ना की, महार एक स्वभावसिद्ध नट असतो म्हणून, त्याचे हे उदाहरण. 'तुम्ही हल्लीच्या माणसांनी शिवाशीव केली म्हणून काय आम्ही रीत सोडायची? जहागीरदारांकडे कशी वागणूक पाहिजे ती काय आपल्यासारख्यांनी विसरायची होय?' असेच जणू तो मला विचारीत होता. पण हे करीत असताना त्याच्या तोंडावर किंचित हसू होते. त्याच्या डोळ्यात मिस्किलपणा भरलेला होता. “हे सगळे नाटक आहे, हे तुम्हाला ठाऊक आहे अन मला पण ठाऊक आहे." हाच त्याचा भाव होता. नागपूरला बेझन बागेत मी मापे घेत होते व माझ्याभोवती महारांचा घोळका जमला होता. ही मापे मी का घेते? ह्यापासून काय अनुमाने