त्यात त्यांना पिढीजाद मिळालेले मनुष्यस्वभावाचे ज्ञान फार उपयोगी पडते.
हजारो वर्षे हीन स्थितीत काढून आता इतरांच्याबरोबर आम्ही आहोत ही
भावना येऊ लागल्याने ह्या पिढीतील महारांची मनोवृत्ती मोठी नाजूक व
भावनाप्रवण असते. वंशपरंपरा बळावलेले गुण व नवी परिस्थिती यांचे द्वंद्व
त्यांच्यात उत्कटतेने पाहावयास सापडते. पैसे चांगले मिळोत किंवा थोडे
मिळोत, महार चांगले कपडे घालतो, हे त्याच्या कलावान मनाचे दर्शक आहे
असे मला वाटते. मी पाहन ठेवले आहे की, वर्गात साधारणपणे गबाळ
पोशाक करणारे विद्यार्थी ब्राह्मण असतात. मराठ्यांचा पोशाक साधारणपणे
बऱ्यापैकी असतो, व सर्वात झोकात असतो महार. ब्राह्मण आज चार पैसे
मिळाले तर दोन मागे टाकील. पण महार आज सर्वच्या सर्व खर्च करील व
उद्या परत पोटासाठी वणवण हिंडेल.
मी पुण्यात निरनिराळ्या मराठा जातींची पाहणी करीत होते. एक
दिवस महारांची व इतर काही जातींची मोजणी चालली होती. प्रत्येक
माणसाचे नाव, गाव व पोटजात नोंदवहीत टिपून घ्यावयाची व नंतर त्याच्या
डोक्याची मापे घेऊन रक्त घ्यावयाचे असा क्रम असे. माझ्या शेजारी माझा
एक महार विद्यार्थी उभा राहून मला मदत करीत होता. येतील तसतशी नोंद
होत होती- महार, भंगी, मांग, मांगगारुडी वगैरे. एवढ्यात एकजण आला व
त्याने आपली जात 'हरिजन' म्हणून सांगितली. एक लहानसा विजेचा धक्का
बसावा तसे सर्वांना झाले. मी माझ्या विद्यार्थ्यांकडे पाहिले तो त्याच्या
चेहऱ्यावर राग, विषाद, तुच्छता हे विकार दिसत होते. त्याची-माझी
दृष्टादृष्ट झाली तशी तो थोडा हसला. त्या हरिजनाला मला विचारावे
लागलेच, “अहो, 'हरिजन' शब्दाने जात कळत नाही... माझ्या कामासाठी
मला तुमच्या पोटजातीची नोंद करायची आहे." "अरे, 'हरिजन', 'हरिजन'
काय चालवले आहेस? सांग की, तू महार आहेस म्हणून..." माझा विद्यार्थी
हेटाळणीने म्हणाला, स्वाभिमानी महारांना 'हरिजन' शब्दाचा तिटकारा
वाटतो. 'हरिजन' शब्दातील करुणा, खोटी दया त्यांना नको आहे. 'महार'
शब्दामागे इतिहास आहे, परंपरा आहे. त्यांना 'महार' म्हणूनच मानाने
जगायचे आहे. अशाच कितीतरी प्रसंगी महारांचे वैशिष्ट्य माझ्या नजरेस
आले व अरबी समुद्रापासून तो वैनगंगेपलीकडे सर्व महार इथून-तिथून
एकाच साच्यातले ही गोष्ट अनुभवास आली.
खानदेशातल्या एका गावी एका संध्याकाळी वंजाऱ्यांची मापे आटपून
पान:Paripurti.pdf/71
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
परिपूर्ती / ८३