पान:Paripurti.pdf/64

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७६ / परिपूर्ती
 

 बिचारा लालाच काय, पण इतर परप्रांतीयांनासुद्धा मराठ्यांच्या वागणुकीचे आश्चर्य वाटते. मराठ्यांना व्यवहारच नाही हा सिद्धांत तर मी आतापर्यंत पाच-पंचवीस वेळा तरी ऐकला असेल.
 पुष्कळ वर्षांमागची गोष्ट. मी शेटना आमचे नवीन घर दाखवीत होते. घर दाखवून झाल्यावर त्यांनी बारीक चौकशी केली- जमिनीला काय पडले? घराला काय पडले? वगैरे आणि शेवटी विचारले, “पण ताई, एवढे पैसे कुठून आणले?" मी बेफिकीर स्वरात सांगितले, “थोडे जवळ होते ते दिले व बाकीचे कर्ज काढले- फेडू हळूहळू." शेटनी गंभीरपणे मान हलवली- “छे, हेच पैसे तुम्ही एखाद्या धंद्यात गुंतवले असते तर तुम्हाला दरवर्षी इतके व्याज आले असते. त्या व्याजापैकी काही भाग देऊन भाड्याचे छान घर घेता आले असते. परत उरलेले व्याज रकमेत टाकून वीस वर्षांत चांगली पुंजी जमवता आली असती. पण तुम्हा मराठ्यांना (महाराष्ट्रीयांना) व्यवहारच कळत नाही. आपले असे घर आणि मागे-पुढे अंगण असले म्हणजे तुम्हाला वाटते स्वर्ग हाती आला." मी हसून म्हणाले, “शेटजी, तुम्ही हेटाळणीने म्हणून जे म्हणाला ते अगदी शंभर टक्के खरे आहे. बँकेतल्या पैशांचे व्याज खाण्यापेक्षा स्वत:ची झोपडी का होईना, असली म्हणजे आम्हाला जन्म सफळ झाल्यासारखा वाटतो." ह्या मराठ्यांना काही अक्कलच नाही असा अभिप्राय त्यांच्या तोंडावर दिसला, व त्यांनी आमचा निरोप घेतला.
 आमच्या ओळखीच्या परप्रांतीय संस्थानिकांना वर्षाकाठी घर घ्यावयाचे होते. घर बघून पसंत केले, वर्षाचा भाडेपट्टा झाला व उद्या राहायला यायचे एवढ्यात मंडळींच्या लक्षात आले की, घरात विजेचे दिवे नाहीत. आता काय करायचे? दिवस लढाईचे म्हणून वीज कंपन्या नव्या घरांना वीज देत नव्हती व तिथे वशिला चालेना. एवढ्यात राजेसाहेबांना असे आढळले की, त्यांच्या आळीत एका पाटीलबुवांचा वाडा व जमीन होती. तेथील विहिरीसाठी मोठा विजेचा पंप लावला होता- त्यातून पाटीलबुवांनी मेहेरबानीने दोघाचौघा शेतकऱ्यांना विजेच्या तारा जोडून दिल्या होत्या. आणि व्यवहार जरी चोरीचा होता तरी वीज कंपनी तिकडे कानाडोळा करीत होती- तसेच काही संधान राजेसाहेबांनी पाटीलबुवांकडे लावले तर वीज कंपनी त्यात ढवळाढवळ करणार नव्हती. राजेसाहेब लगेच आपल्या भारी किंमतीच्या प्रचंड मोटारीत बसले व पाटीलबुवांकडे आले. राजेसाहेबांची मोटार सुरेख व खूपच मोठी होती. आमच्या भिकार गावात