पान:Paripurti.pdf/63

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
परिपूर्ती / ७५
 

अदभुत दृश्य दिसले. कामकरी नुकतेच कामावर आले होते आणि मोठे रिंगण करून उभे होते. मध्यभागी लाला रागाने अक्षरश: नाचत होता. त्याच्या तोंडून शिव्यांचा भडिमार चालला होता. तो तुळशीरामाची गठडी वळायच्या गोष्टी बोलत होता. त्याचा आधीच लाल असलेला चेहरा रागाने आता फुटणार असे वाटत होते. तो मान उंचावून आकाशात हात नाचवीत “खाली तर ये म्हणजे तुला दाखवतो" असे वारंवार म्हणत होता. साहेबाने वर पाहिले तर सगळ्यात उंच नि अरुंद परांचीवर तुळशीराम एखाद्या माकडासारखा बसला होता व नि:शब्द हसत होता. साहेबाला पाहताच लाला जरा थबकला. पण पुढे होऊन सलाम करून त्याने आपले गाऱ्हाणे साहेबांना सांगितले की, ह्या तुळशीरामाने माझी वळकटी कुठे नाहीशी केली आहे, ती मला परत करवा. साहेब आलेला पाहताच तुळशीरामही माकडा- सारखा झरझर खाली आला. “काय रे, लालाची वळकटी तू चोरलीस काय? कुठे आहे ती?" "मी नाय चोरली बा-- मी ती दर्यात फेकून दिली." तुळशीराम म्हणाला. लाला म्हणाला, “चोरून वर खोटं बोलतो आहे. माझी दुलई होती व तीत शिवलेले पैसे होते.” तुळशीरामाने लांब हात केला व बोट दाखवून म्हटले, “ती बघ तिकडे मी फेकली- अजून सापडेल. जा जाऊन बघ." लाला व त्याच्याबरोबर दोघेतिघे धावतच किनाऱ्याशी गेले व साहेब तुळशीरामाला घेऊन आत गेले. सकाळी लाला उठून बाहेर गेला व ही संधी साधून तुळशीरामाने वळकटी पळवून फेकून दिली होती एवढी हकीकत जो साहेबाला कळते तेवढ्यात लाला आला. त्याचा राग कमी झाला होता- पैसे न वळकटी भिजलेली, पण काहीही चोरीस न जाता मिळाली होती. तो जरा हसतच म्हणाला, “मालिक, ये बिलकुल बेवकूफ है. रजाईमें सौ रुपिये थे वे सब वापस मिले। इसकु कुछ पैसे की बात मालूम नहीं हुई!" साहेबांनी तुळशीरामाकडे पाहिले. क्षणभर दाघाचे डोळे भिडले. दोघांच्याही चेहऱ्यावर हसू झळकले. साहेब आणि तुळशीराम दोघेही 'बेवक्फ मरगढे'- काय हसण्यासारखे झाले त्यांनाच माहीत. एवढे खरे की. त्या दिवसापासून लाला परत तुळशीरामाच्या वाटेस गला नाही. पण ह्या मठ्ठ मराठ्याने मोठ्या युक्तीने वळकटी हस्तगत करून ती हातोहात न लांबवता समद्रात कशी फेकली व आपले पैसे कसे परत मिळाले हे सांगताना बाकीचे मठु मराठे हसत का नाहीत हेही त्याला कधी कळले नाही.