पान:Paripurti.pdf/62

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७४ / परिपूर्ती
 

घोळतो." साहेब दोघांना घेऊन हाफिसच्या खोलीत गेले व तुळशीरामाला शांत करीत झाली हकीकत त्यांनी विचारली. लाला रोजच्याप्रमाणे तयार होऊन बांधकामाच्यापुढे उभा होता. कामकरी येतायेता गर्दीत एकाचा धक्का लागून तुळशीराम ढकलला गेला व तोल सावरता-सावरता त्याचा पाय लालाच्या शेजारीच ठेवलेल्या वळकुटीवर पडला. "क्यों साला, बेवकूफ! तुम क्या अंधे हो?' लालाने गुरकावले. ते सहन न होऊन तुळशीराम लालाचा जीव घ्यायला धावत होता. “अरे तुळशीराम, काय हमरीतुमरीवर येता? जा पाहू कामाला. लाला! माझ्या माणसांना शिव्या दिलेल्या मला खपणार नाहीत." असे दोघांनाही सांगून साहेबांनी दोघांना दोन दिशांना पाठविले. तरी जाता-जाता लाला 'बेवकूफ मरगळे!" असे पुटपुटला. ते ऐकून तुळशीराम दारापर्यंत गेलेला तावातावाने परत आला व साहेबांच्यापुढे हात नाचवीत म्हणाला, "बघ, सायबा, कसा माजला आहे बैल!- थांब, त्याला दाखवलंच पाहिजे. त्याची वळकटीच फेकून देतो समुद्रात." "माझे आई! जा आता कामावर..." साहेबांनी परत सांगितले व तुळशीराम निघून गेला. त्या दिवसापासून लाला प्रत्येक कामकऱ्याला सांगायचा की, तुळशीराम माझा बिछाना दर्यात टाकणार आहे आणि हसायचा, आणि सगळीजण हसायची. पण तुळशीरामाने लक्ष दिले नाही. तो फक्त जळजळीत दृष्टीने लालाकडे पाहायचा. तुळशीरामाचे काम सर्वात उंच जागी असायचे. तो होता खारवी. दुसऱ्यांचे डोळे फिरतील इतक्या उंचीवर अरुंद फळ्यावरून तो खुशाल बेफिकीर इकडून तिकडे जायचा व आपले काम करायचा. उंच वाशावर चढून परांच्या बांधायच्या, टोकावर कप्पी बसवायची, कप्पीची दोरी सरकली तर वर चढून ती परत बसवायची: ही कामे म्हणजे त्याच्या हातचा मळ. स्वारी तशी सरळ, पण लालाची मरी तो कधी ऐकून घ्यायला नाही; आणि सर्वांना धास्ती वाटायची की, एखादे दिवशी लालाने थपड मारली तर ह्या काटकुळ्या प्राण्याचा जीव जायचा म्हणून. ज्या इमारता बांधकाम चाललेले होते तेथे वरच्या मजल्यावर तळशीराम निजायचा आणि खालच्या दाराशी लालाचा पहारा असायचा, आणि रोज त्यांच्या कटकटी चालायच्या. ह्या दोघांचे भांडण म्हणजे सायबालासुद्धा कुतूहलाचा विषय होता. ही उंदीर-सिंहाची चुरस मोठी मजेची होती. त्यालाही तुळशीराम लालाची वळकटी समुद्रात टाकणार ह्या कल्पनेने हसू आले. हे भांडण झाल्यापासून दोन-तीन दिवसांनी साहेब जो कामावर येतो तो त्याला एक