या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
परिपूर्ती / ७१
मधल्याला आंघोळ घालीत होती. आजीबाई स्वैपाकघरात काहीतरी तळीत होत्या, त्याचा खमंग वास घरभर दरवळला होता, व त्यांच्या शेजारी जिन्नस कधी होईल म्हणून एक ‘चिक्कमूर्ती' केव्हाची वाट पहात बसली होती. पणजीबाई माझ्या शेजारी बसून एकासाठी लोकरीचा अंगरखा विणीत होत्या. आणि माझी सखी?... तिच्या हातात टपालाने नुकतेच आलेले पत्र होते. तिचे डोळे दूर कुठे लागले होते. तिच्या ओठांवर गोड हसू होते. तिच्या तोंडावर उत्कंठा होती. अगदी आतल्या गाभा-यातल्या दोड्ड वैष्णवमूर्तीच्या पूजेत तिची समाधी लागली होती हे काय सांगायला पाहिजे?