पान:Paripurti.pdf/57

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
परिपूर्ती / ६५
 

होते- अगदी पक्का युक्तिवाद होता. म्हणूनच तर आकाशवाणी वगैरे नेहमीच्या दैवी चमत्कारांचा उपयोग नव्हता. जेथे ज्ञान किंवा शास्त्र लंगडे पडते अशा ठिकाणी दैवी उपायांचा अवलंब केला जातो; पण ज्या वेळी एखादी गोष्ट पक्की नि:संदेह माहीत असते, तेव्हा दैवी उपायांच्या मदतीची आवश्यकता नसते. जुळे होईपर्यंत जी गोष्ट केवळ प्रवादरूपाने होती ती आता नि:संदेह सिद्ध झाली होती व त्यावर सीतेचे लोकविलक्षण भयंकर दिव्य हाच एकमेव उपाय होता. तेव्हापासून आतापर्यंत जुळी मुले म्हणजे व्यभिचाराचा पुरावा असा समज असूनही सीतेच्या शुद्धत्वाविषयी सर्व प्राचीन व अर्वाचीन कवींची खात्री आहे, अगदी जुळे झाले तरीसुद्धा खात्री आहे! मराठी कवीप्रमाणे जुळे झालेच नाही असे म्हणण्यापर्यंत कित्येकांची मजल जाते. लोकांच्या अगदी रुजून बसलेल्या समजुतीविरुद्ध घटना होऊनही सीतेने हा कौल कसा मिळविला? रामाला सीतेचा परत स्वीकार करण्याची इच्छा होती. सीतेचे तर सर्व हृदय राममयच होते. रामाच्या प्रेमाचा उपभोग परत घ्यावयास तिचेही मन आसावलेलेच होते. पण प्राप्त परिस्थितीत वसिष्ठ, अरुंधती व वाल्मिकी ह्यांच्या सांगण्यावरून रामाने तिचा स्वीकार केला असता तरी लोकप्रवादाने ताबडतोब परत उचल खाल्ली असती, व त्यांच्या सासारिक जीवनात प्रवादाचा विषार परत भिनला असता. प्राप्त परिस्थितीत पूर्वीचा प्रसन्न, आनंदमय संसार करणे अशक्य होते. हे सर्व जाणूनच सीतेने मुलांचा, प्रियकराचा, राणीपणाचा एका क्षणात त्याग केला. ह्या असामान्य त्यागानेच त्या वेळच्या शास्त्राला खोटे ठरविले, व ज्या सीतेला जिवंत राहून उजळ माथ्याने वावरता येणे शक्य नव्हते ती मृत्यूने शुद्धचरित्रा, प्रेममय, साध्वी सीता म्हणून भारतात अमर झाली.