घेऊन आली. तिने बाळाला शेजारच्या एका दगडावर, आपल्यापासून
जवळच असे ठेवले व ती धुणी धुऊ लागली. सीता बाळाला घेऊन गेल्यावर
थोड्याच वेळाने रानातून कंदमुळे, फळे वगैरे घेऊन तातोबा आले.
नित्याप्रमाणे त्यांनी बाळाच्या पाळण्यात डोकावून पाहिले तो बाळ नाही!
म्हाताऱ्याला धक्काच बसला. कोणी श्वापदाने बाळाला पाळण्यातून ओढून
नेले वाटते! आता सीता परत आली आणि तिला हे कळले म्हणजे ती
आकांत करील- ती खात्रीने प्राणच टाकील- असा मनात विचार येऊन
सीतेला दु:ख नको म्हणून ऋषींनी योगबलाने गवतापासून नवा मुलगा उत्पन्न
केला व त्याला पाळण्यात घालून आंदुळत बसले. धुणी झाल्यावर कडेवर
मूल व डोक्यावर धुणी अशी सीतामाई घरी येऊन पोहोचली. पाहते तो
तातोबा पाळणा हालवीत बसले आहेत व पाळण्यात एक बाळ! तशी ती
म्हणते, “माझे बाळ माझेपाशी! तुम्ही हालविता कोणाशी?' सर्व घटनेचा
उलगडा झाल्यावर वाल्मिकीने तिला नव्या बाळाचा पण स्वीकार करावयास
सांगितले व “लह तो पोटीचा। आकोस (अंकुश) धर्माचा। सीताबाई झाला।
पवाडा तुझ्या कर्माचा।।" ह्या ओळींनी हे कथानक संपते. कवीच्या मते ह्या
विलक्षण घटनेने सीतेला दोन मुले झाली अशी वार्ता सर्वत्र पसरली व तिच्या
चारित्र्याचा डांगोरा जगभर झाला. लोकांना त्या दुसऱ्या मुलाच्या उत्पत्तीचा
खरी कथा माहीत असती तर सीतेला रामाने परत घेतली असती. सीतेच्या
शुद्धतेविषयी जशी कवीची खात्री, तशी जुळी मुले अव्यभिचारिणीला होणे
शक्य नाही हीही खात्री. बरे, दोन मुले होती अशी तर मूळ कथा! तीही खोटी
म्हणणे शक्य नाही. म्हणून उदभवलेल्या पेचातून सुटण्यासाठी त्याने वरील
युक्ती योजली.
आणि ह्या जुन्या गाण्यात व कुंतीच्या उदगारांत तर सीतात्यागाच्या
रहस्याचा उलगडा नाही ना? सीतेबद्दल लोकांत प्रवाद होता. रामाने तिला
वाल्मिकीच्या आश्रमात पोहोचवली व ती बाळंत झाल्यावर, तिला व
मुलाला वाल्मिकीने पुढे घालून आणावे व परत तिचा स्वीकार व्हावा असा
बेत झाला असावा. मुलगा चक्रवर्तिचिन्हांकित आहे, रामाचाच
असल्याबद्दल दैवी पुरावे, आकाशवाणी, सर्व काही ब्राह्मणांच्या साहाय्याने
करता येणे शक्य होते; पण दुर्दैवाने तिला जुळेच झाले! लोकभ्रमाला सीता
बळी पडली नाही. “द्वंद्वाह्लाने फलद्वयमा' हा त्या वेळचा केवळ
अशिक्षितांचा समज वा 'लोकभ्रम' असणे शक्य नाही. हे त्या वेळेचे 'शास्त्र'
पान:Paripurti.pdf/56
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६४ / परिपूर्ती