पान:Paripurti.pdf/52

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


परिपूर्ती / ५९
 

सुरुवातीला व शेवटी विशिष्ट प्रार्थना असते, आठवड्यातून एकदा बौद्धिक(?) असते. हे सर्व ज्यांना पसंत आहे त्यांनीच खेळायला यावे, इतरांनी नाही. दलात पाच वर्षांपासून पंधरा वर्षे वयापर्यंत मुले आहेत. तेव्हा शाळांतील मुलांना पक्षाचे शिक्षण द्यावे की नाही, हा प्रश्नच उभा राहत नाही.
 निरनिराळ्या पक्षांची बौद्धिके मी पाहिली आहेत. सर्व भर असतो संघटनेवर. संघटना करा, संघ, दल, समितीप्रमुखाच्या आज्ञेचे पालन करा, पक्षाच्या निशाणाला नमस्कार करा, पक्षाच्या पुढा-याला भजा, ह्या शिकवणीत आणि एकेश्वरी पंथाच्या शिकवणीत फरक काय?
 म्हणून म्हणते, माझे प्रतिगामी मन मरू घातलेल्या लिबरल पार्टीसाठी, अनेक दैवतवादासाठी, परस्परसहिष्णुतेसाठी, साध्या माणुसकीसाठी हळहळते आहे.