पान:Paripurti.pdf/46

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५२ / परिपूर्ती
 

 महाराष्ट्रात फिरता फिरता अशा किती गौराया मी पाहिल्या आहेत! किती कष्ट करतात! किती अधिकार गाजवतात! गौरीचा लाडिकपणा, गौरीचा भोळेपणा, गौरीचा प्रेमळपणा, सगळे त्यांच्यात दिसून येते. ती हिमालयाची मुलगी, तर ह्या सह्याद्रीच्या माहेरवाशिणी. वन्य, राकट, पण प्रेमळ. आपल्या तापट रानटी भावांना सांभाळणाऱ्या, आपल्या रागीट नवऱ्यांना ताळ्यावर आणणाऱ्या, भोळ्या सदाशिवांच्या डोक्यावर बसलेल्या अशा पार्वत्या सर्व जातींत सर्व महाराष्ट्र भर दिसतात. त्याना उत्तरेकडील सुसंस्कृत रुबाबी-नबाबी बोलणे-चालणे माहीत नसेल, त्यांच्या हास्यात नाजूकपणा नसेल, त्यांच्या जिभेच्या रासवटपणात प्रेमाचा ओलावा कोणाला दिसत नसेल तर ते पाहणाऱ्यांचे दुर्दैव. बजाबाई विधवा होऊन वीस वर्षे झाली असतील. नवऱ्याचे दुःख ती कधी कोणाला दाखवीत नाही; पण नुकतीच ती नवीन लुगडे नेसून आली होती तेव्हा मी तिला म्हणाले, "बनाबाई, भाऊ अगदी चोज करतात नाही तुझे? काय सुरेख लुगड घेतल आहे!" तशी तिचे हसे मावळले. सुकलेला चेहरा एकदम उदासीन व दु:खा दिसला. ती बोलली तेसुद्धा स्वत:च्या शब्दांत नाही, तर तिच्या देशातील स्त्रियांच्या अनंत अज्ञात पिढ्यांनी दोन ओळींच्या साठवलेल्या त्याच्या हृदयाच्या व्यथेत. ती म्हणाली, "बाई, काय करायची दिराभावाची पालखी? भर्तारावाचुनि नार दिसते हालकी!"
 आमची माळीणबाई अगदी म्हातारी झालेली आहे. तिचा नवरा तर कित्येक वर्षे काम करीत नाही. त्यातून गेले वर्षभर त्याला भ्रम झालेला. तो नाही-नाही ते बायकोकडून मागतो. पण ती बिचारी त्याचे सगळे कोड पुरविते. परवा डोक्यावरची पाटी अंगणात ठेवून जरा विश्रांतीसाठी खाली बसली. मी म्हटले, “काय माळीणबाई, कसं काय माळीबुवा, बर आहेत ना?" ती कावून-थकून गेली होती. "नुसता तरास हाय बाई! आज मला म्हनतात, 'तू कुनाकडे भाजी इकू नकोस. मी नाही तुला जाऊ देणार.' मी त्यांना चुकवून आले बघा. भाजी इकू नको तर खायला काय घालू कपाळ!" आमचा भागू तरुण आणि फटकळ. तो म्हणतो, “काय म्हाताऱ्याचा वनवास आहे तुम्हाला? एकदा गेला तर सुटाल तरी.” “नग-नग. भागुजी, अस म्हनू नये रे राजा. तुला काय ठावं त्यांनी मला किती सुखाचे दिवस दावले ते!" म्हातारीने डोळे टिपले. अशी ही शंकर पार्वतीची सदा भांडणारी, सदा रुसणारी, गळ्यात गळा घालणारी जोडी आहे.