आले नाही. “ठीक आहे न गया?" “होय जी.” असे तो परत पुटपुटला व
आता ही बाई विचारणार तरी काय-काय या भीतीने खालच्या मानेने आपला
चालू लागला. गया बाळाला घेऊन आल्यावर मी तिला ही हकीकत
सांगितली. तशी ती पोटभर हसली व मान वेळावून म्हणाली, “तसेच हैत ते.
कोणाशी बोलायचं म्हंजे जिवावर येतं त्यांना. मी एवढी घरात बोलते ना, पण ते
निसते हं म्हंतील. नाही तर नाही म्हंतील. आन निसते भोळे सांब! माजी सासू
सांगेल ते ऐकायचं. आता कुटं चार पोरं झाल्यावर मी काय सांगते ते
ऐकतात.”
बजाबाई तर आली म्हणजे सगळ्या घरादाराला जाहिरात लागते.
“अहो माळीदादा, बाई हैत का?" अशी खणखणीत आरोळी ऐकू आली
की, घरातली माणसे मला म्हणतात, "हं. आला वाटतं तुझा पठाण!"
उंचनिंच, हाडाने रुंद अशी आहे ती. रूपसुद्धा चांगले आहे, पण कष्टाने चेहरा
सुकलेला. बिचारी विधवा आहे आणि आपल्या दोन भावांचा संसार करते.
भावजय घरात शिजवते, भाऊ धारा काढून गावात दूध विकतो, आणि
गोवऱ्या करणे, म्हशी विकणे, विकत घेणे, चार माणसांजवळ गोड बोलून
कर्ज काढणे, ते फेडणे, म्हशीचे गवत, पेंड, सरकी विकत घेणे आणि अगदी
तिच्या मर्जीतल्या खाशा गि-हाईकांना स्वत: दूध घालणे हे सगळे ती स्वतः
करते. मावळातल्या भावांकडून चिंच आली की ती विकणे, काकड्यांची
गाडी आली की भावाला घेऊन जाऊन आपल्या मोजक्या गिऱ्हाईकांना
पाट्या ओपून त्याला पैसे करून देणे; कशी बाई एकटी एवढी कामे करते
कोण जाणे!- भाऊसुद्धा चांगले कामसू आणि देखणे, पण तिच्यासारखा
व्यवहार काही त्यांना जमत नाही. तिची सगळ्या कुटुंबावर हुकूमत, पण ती
काही नुसती बसून हुकूम सोडणारी नाही. तिचा अधिकार कष्टाने, प्रेमाने
मिळविलेला आहे. आज स्वारी संध्याकाळी आली, “बाई, कावो माज्या
भावाला परत लावला? मी इचारायला लावला होता ‘बाईंना चीच हवी
का?' म्हणून." मी म्हटले, “अग, मला काय माहीत तुझा भाऊ म्हणून! इथे
फाटकाबाहेर घोटाळत होता; मुलांनी विचारलं, 'काय पाहिजे?' म्हणून तशी
म्हणतो, 'माळीबाबा कुठं हायेत?' भागू घरी नव्हता. मी म्हटलं, 'कोण
उगीच रेंगाळतो आहे?' 'जा' म्हणून सांगितलं.” तशी ती अगदी
गयाबाईसारखीच हसली नि मान वेळावून म्हणाली, “आता काय करावं?
निसते भोळे सांब हती. तरी म्यां नीट सांगितलं होतं, बाईंना इचार म्हणून."
पान:Paripurti.pdf/45
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
परिपूर्ती / ५१