Jump to content

पान:Paripurti.pdf/44

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५० / परिपूर्ती
 

आमची बाळाई-सकरुबा आमचा जावाई." मला बायकांचे गाणे आठवले. गौरी महाराष्ट्राचे माहेरवाशिणीचे प्रतीक, तर भोळा शंकर जावयाच्या स्थानी योजलेला.
 आमच्या शेजारीच पाहा ना! तीन भोळे रागीट शंकर आहेत. थोरला भोळसर, मधला रागीट व धाकटा हेकट. पण त्यांच्या घरची गौराई तिघांना पुरून उरते. दिसायला कशी नाजूक दिसते! जयदेवाची सगळी मृदु व्यजने घालावी तिच्या वर्णनासाठी! ठेंगणी, गोरी, नाजुक हसणे, मृदू बोलणे, बोलताना किंचित मान खाली घातलेली, टपोऱ्या डोळ्यांवर पापणी अधवट मिटलेली; पण अशी पक्की आहे! बोलता बोलता जरा मान उचलून तिने डोळे पूर्ण उघडले म्हणजे लक्षात येते की, मांजरडोळ्यांची ही पोर चांगली वस्ताद आहे. थोरल्याच्या दादागिरीला ती दाद देत नाही: मधल्याचा रागीटपणा तिच्यापुढे चालत नाही; धाकट्याला ती नीटपणे प्रेमाने सांभाळील, पण हट्टबिट्ट मुळीच चालायचा नाही हो तिच्यापुढे!... तसेच ते समोरचे बिऱ्हाड सगळी मुले काळी-सावळी, पण मुली दिसायला हशार, हसतमुख, तोंड भरून बोलणाऱ्या, आणि मुलगे सगळे संकोची, मागे-मागे राहणारे!
 जी स्थिती मुलींची तीच मोठ्या बायांची. आमची गया आली म्हणजे फाटकातच तिची सलामी होई. कुत्र्याच्या अंगावर हात फिरवील, मांजराला उचलून घेईल, “काय भागूजी, बागेत काय लावलं आहेस?" म्हणून माळ्याला विचारील. घरात आली म्हणजे धाकटीला गाणे म्हणून दाखवील. “वा ताईबाई! माझ्यापरीस मोठ्या दिसता की!" म्हणून ताईला म्हणेल. आणि मग चहा पिता पिता आपल्या घरच्या सगळ्या हकीकती सांगेल. चार महीने झाले, आली होती. मी म्हटले, "अग या इतक्या लांब कशाला आलीस एवढ पोट घेऊन?... तोंड कसं सुकलं आहे?" ती म्हणाली, "बाई, मी निरोप पाठवला म्हणजे एवढी अंगणातली खाट द्या पाठवून तीन महिन्यांसाठी.", "हात्तिच्या! एवढ्यासाठी का इथंवर आलीस? निरोप का नाही लावलास? ती हसली, “तुम्हाला माहीत नाही का घरधन्याचा सोभाव? ते काही यायचे नाहीत. मग काय करू? 'बाईंनी कबूल केलं तर खाट न्यायला येईन! अस बोललेत मात्र." ती गेल्यावर आठ दिवसांतच तिचा नवरा छकडा घेऊन खाट न्यायला आला. बाहेरच्या बाहेरच जात होता, पण मी थांबवले व विचारले, "कधी बाळंत झाली गया?" “काल." त्याने उत्तर दिले. “काय झाल?" त्याने तोडातल्या तोंडात पटपटत खालच्या मानेने उत्तर दिले ते मला नीट ऐकुच