पान:Paripurti.pdf/42

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


४६ / परिपूर्ती
 

"खरंच छान आहे. ते विक्रमदेव कॉलेज आणि काजूच्या झाडांचा माळ तर मला छान आठवतात," मी मनापासून म्हटले. “आणखी वाल्टेर म्हटलं म्हणजे मला भाजलेल्या काजूचा खमंग वास येऊ लागतो. आम्ही किती काजू विकत घेतले आणि आजारी पडेपर्यंत खाल्ले! तशीच तुमच्या वाल्टेरची आंब्याची साठी- बर्फीसारखी जाड आणि मधुर."
 आपल्या शहराची स्तुती ऐकून मारी खुशालली. सारम्मा पलीकडून म्हणाली, “काय म्हणता वाल्टेर इतकं छान आहे! मला तर वाटतं, मद्रासइतकं सुंदर शहर नाही. समुद्रकाठचा मोठा रस्ता व सुंदर-सुदर इमारती! तुम्हाला नाही आवडत मद्रास? तुम्ही मद्रासलाच राहता ना?"
 तसे पाहिले तर मद्रास मला कधीच विशेष संदर वाटले नव्हते, पण मद्रासबद्दल मत सांगणे नको म्हणून मी म्हटले, "छे! मी मद्रासची नाही... कोचीनची गाडी पकडण्यासाठी मला मद्रासला यावं लागलं. मी आहे पुण्याची.” “अहो तुमचं पुणं कसं आहे हो? आणि कशाबद्दल प्रसिद्ध आहे?" मारीने विचारले.
 “आता मात्र पंचाईत आली खरी. पुण्याबद्दल कोणी काही विचारले म्हणजे माझी त्रेधा उडते. बाकीच्या किती गावांविषयी वा शहरांविषया बरेवाईट मत देताना माझी जीभ मुळीच अडखळत नाही. पण कुणा पुण्याबद्दल विचारले म्हणजे मला अगदी पेचात पडल्यासारखे होते. पुणे म्हणजे इतर गावांसारखेच एक गाव आहे, त्याला रूप आहे, त्याला वाण आहे, त्याला गुण आहेत व त्या सर्वांचे नीट योग्य शब्दांत वर्णन करता येईल ही कल्पनाच मला करता येत नाही. आपल्याला अतिपरिचय नसलेल्या माणसांबद्दल कोणी काही विचारले तर आपण नाही का चटदिशी उत्तर देऊन मोकळे होत? पण तेच अगदी आपल्या जवळच्या माणसाच्या स्वभावाबद्दल आपल्याला काही सांगणे कसे जड जाते? तसेच माझे पुण्याबद्दल होते. पुणे म्हटले म्हणजे हजारो चित्रे माझ्या डोळ्यांपुढून जातात- हजारो आठवणी गर्दी करून उसळतात व त्यातील कुठचे पुणे हेच मला ठरवता येत नाही. लहानपणी तपकीरगल्लीतून बाहेर पडले की किर्लोस्कर नाटकगृहापासून तो बाहुलीच्या हौदापर्यंतचा रस्ता म्हणजे मला एक माणसांचा समुद्र वाटे, व दाजींचा हात धरून मंडईपर्यंत जाऊन आल्यावर केवढा पराक्रम केला अशा फशारकीत मी असे. जरा मोठी झाल्यावर फुटक्या बुरुजावरून शनिवारच्या रस्त्याने पांजरपोळातून हसबनिसांच्या बोळात एका मैत्रिणीकडे जात-येत