Jump to content

पान:Paripurti.pdf/40

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४४ । परिपूर्ती
 

मन मुलासारखे सरळ होते. त्यात गुंतागुंत नव्हती, साशंकता नव्हती- आयुष्यात जे पडेल ते करायचे, जे मनात येईल ते बोलायचे. काय तिला कधी धक्के बसलेच नव्हते का? इतका का तिच्या जीवनाचा मार्ग सरळ गेला होता? मी तिला विचारले, "तुम्ही काय करता? कॉलेजात असता होय?" "छे, छे! मी वेड्यांच्या एका इस्पितळात मुख्य नर्स आहे." तिने सांगितले. “वेड्याच्या संगतीत संबंध दिवस घालवायचा म्हणजे फार कठीण नव्हे का?' मी विचारले. “नाही हो, मुळीच नाही. उलट दवाखान्यातल्या कण्हणाऱ्या-कुंथणाऱ्या रोग्यांपरीस हे बरं! मुलांसारखं त्यांचं करावं- त्याच मन रमवावं. आठवड्यातून दोनदा मोटारीत घालून त्यांना फिरायला नेते. कोणाला वाटतं आपण राणी आहोत, म्हणून तिच्याशी तसं बोलावं; एकाला वाटतं, मी मोठा वकील आहे, म्हणून त्याच्याशी कोर्ट-कचेरीची बोलणी काढावी; एकीला वाटतं की, तिला खूप मुलं आहेत- तिला बाहुल्या आणून दिल्या आहेत- रोज ती आपल्या मुलांच्या गोष्टी सांगते. आणि खर सांगु का हो, ती लहानपणीच विधवा झाली आहे. तिला हो कुठची मुल?" मारीकुट्टी मोठ्याने व मनापासून हसली. मला क्षणभर त्या हसण्याचा राग आला; पण मग लक्षात आले की, मारी हसली ती काही दुष्टपणाने नव्हे- केवळ बालिशपणामुळे. जिला कधी मूल झालेच नाही तिने आपल्याला मुले आहेत म्हणून सांगावे हा विरोधाभास तिच्या बद्धीला कळला. त्याच्यामागच्या भग्न मनोरथांचे आकलन होण्याइतकी ती मोठी झाली नव्हती- नाही, कधीही होणार नाही. तिचे म्हणणे बरोबर होते. एरवीचे रोगी आयुष्याच्या झगद्यात दुखावलेले, पराजित झालेले, सदा कष्टी असे असतात; पण वेड्याच नाही. त्यांना आयुष्यात जे मिळवता आले नाही ते मिळवलेच ह्या गोड भ्रातीत ते आनंदात असतात. त्यांनी जीवनाचा पराजय करून हेचि देही हेची डोळा निर्वाण- इच्छापूर्ती-गाठलेली असते. ते वेडे आणि ही सदा मूल असलेली त्यांची नर्स! योग्य ठिकाणी योग्य माणूस पडले बुवा! हा विचार माझ्या मनात आला-
 शेजारच्या बाकावरची सारम्मा मोठ्याने हसली. “काय हो, तुम्हाला हसायला काय झालं?" सारम्मा पडल्या पडल्याच म्हणाली, "मला ह्या मारीची गमत वाटली. आता पाहा कशा गप्पा सांगते आहे! दहा-बार वर्षांपूर्वी तुम्ही तिला पाहायची होतीत. एवढीशी काटकुळी पोर होती. नुकतीच नर्सचं शिक्षण घेण्यापूर्वी माझ्या हाताखाली आली होती. सारखी