Jump to content

पान:Paripurti.pdf/38

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



४२ / परिपूर्ती
 

दातांचा प्रकाश पडला. किती कुरूप होती ती! तिचे कपाळ अरुंद होते, केस काळेभोर आणि भुग्यासारखे कुरळलेले, नाक बसके नि फेंदारलेले व ओठ बरेच जाड. तिचे इंग्रजी बोलणे पण कानाला कसेसेच लागे. कुठलेच वाक्य ती व्याकरणशुद्ध बोलत नव्हती; आणि त्यातून जवळजवळ प्रत्येक शेवटचे व्यंजन द्वित्त म्हणायची तिची लकब आणि ‘ओ'च्या जागी ‘वो', 'ई'च्या जागी ‘यी' व 'ग'च्या जागी 'क' म्हणण्यामुळे तिचे बोलणे पण कानाला कठोर लागत होते. ती धाडकन माझ्याशेजारी बसली व माझ्याकडे वळून म्हणाली, “माझे नाव आहे मारीकुट्टी (छोटी मेरी)." ती दुसरी बाई म्हणाली, “माझे नाव आहे सारम्मा (सेराबाई)." अर्थात मलाही म्हणावेच लागले, “माझे नाव-" इतक्यात पंखांची फडफड झाली, व मी चकित होऊन इकडेतिकडे पाहिले तो समोरच माझ्या पेटीवर एक मोठे थोरले टोपल ठेवलेले दिसले. त्यातूनच पक्ष्यांचा फडफड शब्द ऐकू आला. कोंबड्या दिसताहेत- आता माझ्या पेटीची काय घाण होईल देव जाणे! असे मनात येऊन मी 'कोंबड्या कुणाच्या?" म्हणून विचारण्यासाठी मारीकुट्टीकडे नजर टाकली. ती सारमाशी बोलण्यात गर्क झाली होती. इतक्यात तिच्या डोक्यात काहीतरी हलल्याचा भास झाला आणि मला एक विलक्षण दृश्य दिसले- मारीकुट्टीच्या काळ्याभोर कुरळ्या केसांत एक पांढरीशुभ्र 'ऊ' प्रवास करीत होती. त्या दाट कुरळलेल्या केसांत प्रवास करणे काय साप गोष्ट होती? ती ऊ केसाच्या मळसूत्राकार गुंडाळीत सापडली होती का फिरून परत पहिल्या जागीच येई. मला अगदी शिसारी आली. पण माझ डोळे तेथून हलेचनात. ती ‘ऊ' गोलगोल हिंडून थकून जाईल की तिला पुढचा मार्ग सापडेल ही जणू काय मला काळजी लागली होती. एवढ्या मारी नाक फेंदारून कर्कश हसली. तिचे ते रूप, ते बोलणे, त्या घाणेरड्या कबड्या व ती ऊ! माझ्या मनात घृणा उत्पन्न होऊन, नको ते दृश्य म्हणून एक पुस्तक काढून शक्य तो लांब कोप-यात अंग चोरून बसून वाचावया सुरुवात केली.
 अर्धा तास झाला असेल. डब्यात सामसूम होते. ती स्तब्धता मला जाणवून मी वर पाहिले तो सारम्मा पलीकडच्या बाकावर पाय लांब पडली होती व मारीकुट्टी माझी पेटी शेतखान्यासमोर ओढून, शेतखान्या दार उघडे टाकून, एका हातावर हनुवटी टाकून एकाग्रतेने पायखान्या खोलीत टक लावून बसली होती. तिच्या तोंडावरून ती भावनावश झालेली