Jump to content

पान:Paripurti.pdf/25

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



परिपूर्ती / २७
 

काठावर आमच्या माणसांच्या बोलण्याचा आवाज मी जणू स्वप्नात ऐकत होते. “अक्कलदाढा आलेल्या दिसत नाहीत- फारच तरुण होती." ही नोंद मला नकळत मनात होत होती. पण माझे अंत:करण काही विलक्षण हुरहुरीने औत्सुक्याने भरून गेले होते. त्या डोळ्यांच्या खाचात मला बुबुळे हालल्यासारखी वाटली. ते लखलखते दात मागल्या ओळखीने हसल्यागत भासले. माझी बोटे तिच्या अरुंद निमुळत्या हनुवटीशी गुंतली होती, पण हृदय आर्तपणे त्या सांगाड्याला विचारीत होते, “तू ती मीच का ग? तू ती मीच का ग?"